
अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अंबड गावात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी एका डॉक्टरांच्या निवासस्थानी दुपारी दिलेल्या भेटीवेळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘ही व्यक्तिगत भेट असतानाही पोलिसांनी गावाला वेढा घातल्यामुळे खासदारांचा मतदारांवरच विश्वास नसल्याचे दिसले,’ असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी केला आहे.
चौधरी म्हणाले, ‘ज्या मतदारसंघातील जनतेच्या मतांवर वाकचौरे निवडून आले, त्याच मतदारांच्या गावात जाण्यासाठी एवढय़ा मोठय़ा संख्येने पोलीस संरक्षणाची गरज भासणे हे कोणते राजकारण?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘अकोले तालुक्यातील मतदारांनी भरघोस मताधिक्य देऊन खासदारांना निवडून दिले. मात्र, त्याच मतदारांच्या गावात जाताना शेकडो पोलिसांच्या गराडय़ातच जावे लागत असेल, तर हा जनतेवरील अविश्वास असून, मतदारांचा अपमानच आहे,’ असे चौधरी म्हणाले. एकूणच, वाकचौरे हे कट्टर शिवसैनिकांना घाबरत असून, अंबडमधील आजची भेट आणि पोलीस बंदोबस्त चर्चेचा विषय ठरला आहे.



























































