सुनेचा मृत्यूपूर्वी नोंदवलेला जबाब विश्वासार्ह, हायकोर्टाचा सासूला दणका, जन्मठेपेची शिक्षा कायम; न्यायालयाने अपील फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉकेल ओतून सुनेला जाळल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सासूला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पोलिसांनी सुनेचा मृत्यूपूर्वी नोंदवलेला जबाब विश्वासार्ह, स्वेच्छेने दिलेला आणि इतर पुराव्यांशी सुसंगत असल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने सासूचे अपील फेटाळून लावत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

पुणे, हडपसरमधील वाकड येथील मीनाबाई गायकवाड यांनी गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी सुनेकडे पैशाची मागणी केली. यावरून झालेल्या वादानंतर त्यांनी सुनेला रॉकेल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी सून गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मीनाबाईला अटक केली कनिष्ठ न्यायालयाने मीनाबाईला याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात ऍड. सचिन साळुंके यांच्या मार्फत हायकोर्टात अपील दाखल केले. त्यावर न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.