
समुद्रात पर्यटक बुडाला की आरडाओरडा व्हायचा की कुमार राजवाडकर दुकान तसेच उघडं टाकून आपल्या सवंगड्यांसह थेट समुद्राकडे झेपावायचा. तेव्हा एक ट्युब, एखाद्-दुसरं लाईफ जॅकेट आणि दोरी इतकीच साधनसामुग्री घेऊन कुमार राजवाडकर गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवत होते. एकाच वेळी कुमार राजवाडकर यांनी बुडणाऱ्या 17 जणांना वाचवले होते. कुमार राजवाडकर, महेश थावरे, अरविंद घनवटकर गिरीश गिडये, अजित केदार, दीपक काळोखे, आणि राजेंद्र शिंदे हे त्या काळातील लाईफ सेव्हर मॅन होते.
गणपतीपुळे येथे येणाऱया पर्यटकांना समुद्राचा मोह आवरत नाही.त्यामुळे गणपतीपुळ्यात पर्यटक बुडण्याच्या घटना पूर्वीपासून घडत आहेत. त्या काळात किनाऱयावरची मंडळी हीच जीवरक्षक होती. कुमार राजवाडकर यांचे गणपतीपुळे समुद्रकिनारी छोटसे दुकान होते.त्या दुकानात वस्तूंची विक्री करून ते उदरनिर्वाह करत असत. त्या वेळी समुद्रात पर्यटक बुडाला तर किनाऱयावर आरडाओरडा व्हायचा. बुडाला एवढंच कानावर पडलं की कुमार राजवाडकर आणि त्यांचे हे सर्व सवंगडी धावत किनाऱयावर पोहचायचे. त्या काळात फक्त एक दोरी घेऊन कुमार राजवाडकर समुद्रात जात असत. सोबत एक टय़ूब आणि लाईफ जॅकेट असायचे. अशा तुटपुंजा साधनसामुग्रीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मंडळी समुद्रात झेपावत असत.
कुमार राजवाडकर, महेश थावरे, अरविंद घनवटकर, गिरीश गिडये, अजित केदार, दीपक काळोखे आणि राजेंद्र शिंदे ही सर्व मंडळी बुडणाऱयांना अथक प्रयत्न करून वाचवत असत. कधी कधी दुर्दैवाने बुडणाऱ्यांचा मृत्यू व्हायचा. त्या वेळी तो मृतदेह बाहेर काढण्याचे काम ही मंडळी करत होती. 1997 मध्ये गणपतीपुळे समुद्रात एकाच वेळी 17 जण बुडाले होते. त्या बुडालेल्या 17 जणांना वाचवून जीवदान देण्याचे काम कुमार राजवाडकर यांनी केले होते. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कुमार राजवाडकर यांचा सत्कार केला होता. राजेंद्र शिंदे यांनी अनेक मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. ही सर्व मंडळी निःस्वार्थीपणे किनाऱयावर जीवरक्षक म्हणून काम करत होती.




























































