
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<
भारताचा इतिहास हा केवळ पराधीनतेचा आणि पराभवाचा इतिहास नाही, तर तो परकीय आक्रमकांविरुद्ध अखंड चाललेल्या संघर्षाचा आणि आत्मगौरवाचा जाज्वल्य इतिहास आहे. हल्दीघाटीचा हा महासंग्राम आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवत ठेवतो. शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
इतिहास अनेकदा सत्तेच्या छायेत राहणाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार मांडला. त्यामुळे देशाच्या मातीसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक राष्ट्रीय नायकांच्या योगदानाला इतिहासाच्या पानांवर अपेक्षित स्थान मिळाले नाही. हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही अशाच तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आज आवश्यक बनले आहे. आज जेव्हा संपूर्ण देशभर महाराणा प्रताप यांची जयंती असीम श्रद्धा आणि सन्मानाने साजरी केली जाते तेव्हा हेच सिद्ध होते की, राष्ट्र आपल्या खऱ्या सुपुत्रांना कधीच विसरत नाही.
18 जून 2026 रोजी हल्दीघाटी विजयाची 450वी वर्षपूर्ती आणि वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची 486 वी जयंती साजरी झाली. हा केवळ एका युद्धाचा स्मृतिदिन म्हणता येणार नाही, तर मेवाडच्या मातीने परकीय आक्रमकांसमोर न झुकता राखलेल्या ज्वलंत स्वाभिमानाचा उत्सव आहे.
अकबराने महाराणा प्रतापांना आपल्या स्वाधीन करण्यासाठी मानसिंह आणि तोडरमल यांसारख्या चतुर मुत्सद्दय़ांना मेवाडला पाठवले. मोगल सत्तेची अधीनता स्वीकारल्यास राजपुतान्यातील सर्वात मोठे पद दिले जाईल, असा प्रस्ताव अकबराने दिला, परंतु महाराणा प्रतापांनी तो बाणेदारपणे फेटाळून लावत संदेश दिला की, एकवेळ जंगलात राहून पंदमूळ आणि गवताची भाकरी खाणे मी पसंत करेन, परंतु परकीय आक्रमकासमोर हे मस्तक कधीही झुकणार नाही. यातूनच जन्म झाला एका ऐतिहासिक महासंग्रामाचा, ज्याला जग ‘हल्दीघाटीचे युद्ध’ म्हणून ओळखते.
अजोड रणनीतीकार
मोगल सैन्य हे संख्याबळाने आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी मेवाडच्या सैन्यापेक्षा पाच पटीने मोठे होते. अशा असमान युद्धात समोरासमोर लढणे आत्मघातकी ठरले असते. हीच गोष्ट ओळखून महाराणा प्रतापांनी अशा युद्धनीतींचा अवलंब केला, ज्याने मोगलांच्या विशाल सैन्याची ताकद त्यांचा सर्वात मोठा कमकुवतपणा बनली.
- गनिमी कावा (गुरिला युद्धनीती) आणि भौगोलिक लाभ
महाराणा प्रताप हे भारतातील गनिमी काव्याचे आद्य प्रणेते होते. त्यांनी थेट युद्ध टाळून ‘हिट अँड रन’ (हल्ला करा आणि पळ काढा) या तंत्राचा अवलंब केला. मेवाडच्या दुर्गम डोंगरदऱ्यांवर त्यांचे सखोल नियंत्रण होते. हल्दीघाटीची खिंड इतकी अरुंद होती की, एकावेळी तिथून केवळ एक किंवा दोन घोडेच जाऊ शकत होते. अशा ठिकाणी मोगलांचे संख्याबळ व्यर्थ ठरले. डोंगरमाथ्यावर लपलेले मेवाडी सैनिक आणि त्यांचे मित्र असलेले भिल्ल राजे वरून दगड आणि बाणांचा वर्षाव करून मोगलांचा संहार करत असत.
- शत्रूची नाकेबंदी आणि रसद कापणी
युद्धात अन्नाचे महत्त्व ओळखून महाराणांनी मोगलांच्या पुरवठा मार्गांवर (Supply Chains) भीषण हल्ले चढवले. मोगलांचे अन्नधान्य आणि दारूगोळा वाहून नेणारे ताफे ते वाटेतच लुटत किंवा जाळून टाकत. परिणामी, मोगल सैन्याला मेवाडच्या भूमीवर टिकून राहणे अशक्य झाले.
- रात्रीचे हल्ले व छद्मावरण (Camouflage)
रात्रीच्या अंधारात काळे वस्त्र परिधान करून मोगल छावण्यांवर अचानक छापे घातले जात. स्थानिक भिल्ल आणि सैनिक झाडापानांचा वापर करून स्वतःला निसर्गाशी एकरूप करत (Camouflage), ज्यामुळे शत्रू गाफील राहून मारला जाई. या सततच्या मानसिक तणावामुळे मोगल सैन्य पूर्णपणे खचून गेले.
- प्राण्यांचा कल्पक वापर आणि चपळ घोडदळ
मेवाडच्या सैन्यात अत्यंत प्रशिक्षित कवचधारी हत्ती होते, ज्यांच्या सोंडेला तीक्ष्ण दुधारी तलवारी बांधलेल्या असत. शत्रूच्या हत्तींना घाबरवण्यासाठी आगीच्या मशालींचा वापर केला जाई. महाराणा प्रतापांचा प्रिय घोडा चेतक याच्या चेहऱ्यावर हत्तीचा खोटे मुखवटे लावले जात, ज्यामुळे मोगल हत्ती चेतकाला स्वतःचे पिल्लू समजून हल्ला करत नसत. मेवाडचे वेगवान घोडदळ शत्रूला वेढण्यात आणि त्यांची पळवाट बंद करण्यात निपुण होते.
- मानसिक युद्धनीती आणि लोकनिष्ठा
युद्धाच्या वेळी डोंगरावरून अचानक वाजणारे नगारे आणि भीषण रणशिंगे मोगल सैनिकांच्या मनात धडकी भरवत असत. महाराणा स्वतः राजमहाल सोडून जंगलात राहत असल्यामुळे आणि सैनिकांसोबत कष्ट सोसत असल्यामुळे सैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल अथांग निष्ठा होती. कवी आणि भाटांनी रचलेल्या शौर्यगीतांनी सैनिकांमध्ये मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देण्याचे स्फुरण चढत असे.
18 जून 1576 रोजी हल्दीघाटीच्या अरुंद खिंडीत भारताच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध झाले. एका बाजूला अकबराचा सेनापती मानसिंह याच्या नेतृत्वाखालील 50 हजार मोगल सैनिक होते, तर दुसऱ्या बाजूला मातृभूमीच्या रक्षणासाठी कफन बांधलेले महाराणा प्रतापांचे अवघे 30 हजार मेवाडी वीर आणि राणा पुंजा यांच्या हाताखालील भिल्ल सैनिक होते. या युद्धात महाराणा प्रताप यांनी मोगल सेनापती बहलोल खान याच्यावर आपल्या वजनी तलवारीचा असा भीषण वार केला की, एकाच वाराने बहलोल खान आणि त्याचा घोडा या दोघांचेही उभे दोन तुकडे झाले. त्यानंतर चेतकने आपले दोन पाय मानसिंहच्या हत्तीच्या डोक्यावर ठेवले. महाराणांनी भाल्याने वार केला, परंतु मानसिंह हत्तीच्या हौद्यात लपल्यामुळे वाचला. या संघर्षात हत्तीच्या सोंडेला बांधलेल्या विषारी तलवारीमुळे चेतक गंभीर जखमी झाला. महाराणांना शत्रूच्या वेढय़ातून बाहेर काढण्यासाठी झाला मान यांनी मेवाडचे राजछत्र स्वतःच्या डोक्यावर घेतले आणि देशासाठी वीरमरण पत्करले. जखमी चेतकने आपल्या स्वामीला पाठीवर घेऊन एका पायाने पाच किलोमीटरचा प्रवास केला आणि एक 22 फुटांचा मोठा ओढा पार केल्यानंतर प्रताप यांच्या कुशीत आपले प्राण सोडले. हल्दीघाटीचे हे युद्ध कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपले; अकबर हा महाराणा प्रताप यांना ना पकडू शकला, ना मेवाडला झुकवू शकला.






























































