
फुटबॉल विश्वामध्ये केव्हा काय घडेल याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये आला. साखळी फेरीमध्ये संघर्ष करणाऱ्या इक्वाडोरने चार वेळच्या विजेत्या बलाढ्य जर्मनीचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीत धडक दिली. यामुळे इक्वाडोरमध्येही जल्लोषाचे वातावरण असून राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय सुट्टीची घोषणा केली आहे.
न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या सामन्याची सुरुवात जर्मनीसाठी स्वप्नवत झाली होती. सामना सुरू होऊन अवघी दोन मिनिटे झाली असतानाच लेरॉय साने याने गोल करत जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मागच्या दोन सामन्यांत एकही गोल न करू शकलेल्या इक्वाडोरला सुरुवातीलाच बसलेला हा एक मोठा धक्का होता. कोणत्याही सामान्य संघाचे मनोबल यामुळे खचले असते, परंतु इक्वाडोरने हार मानली नाही आणि नवव्या मिनिटाला बरोबरी साधली. निल्सन अँगुलो याने गोलपोस्टचा अचूक वेध घेत इक्वाडोरसाठी या विश्वचषकातील पहिला गोल नोंदवला आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
मध्यांतरापर्यंत सामना 1-1 अशा बरोबरीत होती. उत्तरार्धात चेंडूचा सर्वाधिक ताबा जर्मनीकडे असला तरीही इक्वाडोरने निर्णायक क्षणी कामगिरी उंचावली. 77 व्या मिनिटाला गोन्झालो प्लाटा याने चेंडू जाळ्यात ढकलला आणि इक्वेडोरला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्याची शेवटची 10 मिनिटे आणि भरपाई म्हणून दिलेली 7 मिनिटे कमालीची थरारक ठरली. जर्मनीने बरोबरीसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, तर इक्वाडोरचा प्रत्येक खेळाडू जीवाचे रान करून बचाव करत होता. इक्वेडोरचा प्रत्येक बचाव आणि टॅकलवर प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत होते. मुख्य प्रशिक्षक सेबस्टियन बेक्केसेस सीमारेषेवर अस्वस्थपणे ये-जा करत होते. अखेर पंचांनी अंतिम शिट्टी वाजवली आणि इक्वाडोरच्या खेळाडूंनी मैदानावर धाव घेत एकच जल्लोष केला. मैदानातील खेळाडू आणि स्टँड्समधील प्रेक्षक भावूक झाले होते.
राष्ट्रीय सुट्टीची घोषणा
दरम्यान, टीका, अपमान आणि कठीण प्रसंगांचा सामना करूनही भरारी घेणार्या आणि देशाला आनंद मिळवून देणाऱ्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आभार, असे म्हणत इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय सुट्टीची घोषणा केली आहे.
Gracias a los jugadores y al técnico que, a pesar de las críticas, los insultos y los malos ratos que pasaron, lograron recuperarse y darle esta inmensa alegría al país entero.
¡Mañana, feriado!
Viva el Ecuador.
— Daniel Noboa Azin (@DanielNoboaOk) June 25, 2026



























































