
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ‘ॲनेसी इंटरनॅशनल ॲनिमेशन फिल्म फेस्टिव्हल 2026 ‘मध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी त्यांच्या बहुचर्चित ॲनिमेटेड प्रकल्प ‘बाहुबली: द इटरनल वॉर पार्ट 1’ विषयी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले हा अॅनिमेशनपट आम्ही शक्य तितक्या सर्वोत्तम पद्धतीने साकारणार आहोत.
संवादादरम्यान राजामौली म्हणाले की, ‘बाहुबली’ची संकल्पना हिंदुस्थानी पौराणिक कथांवर आधारित आहे. या कथांना विविध कंगोर असल्याने, चित्रपटाच्या मर्यादित कालावधीत पूर्णपणे मांडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या विश्वाचा विस्तार करण्यासाठी ॲनिमेशन हे अधिक प्रभावी माध्यम ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, पात्रांची हिंदुस्थानच्या संस्कृती आणि मुळांशी असलेली नाळ कायम ठेवत, त्याची दृश्यभाषा मात्र जागतिक प्रेक्षकांना समजेल अशी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक या कथेशी सहज जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजामौली यांनी सांगितले की, कॉमिक्स आणि ॲनिमेटेड मालिकांद्वारे ‘बाहुबली’चे विश्व विस्तारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मूळ चित्रपटांइतका प्रभाव निर्माण झाल्याची भावना त्यांना वाटत नव्हती. याच काळात दिग्दर्शक ईशान शुक्ला यांनी एक वेगळी कल्पना मांडली.
या ॲनिमेटेड चित्रपटात प्रभास पुन्हा एकदा अमरेंद्र बाहुबलीला आवाज देणार आहेत. तर रम्या कृष्णन शिवगामीच्या भूमिकेत आवाज देणार आहेत. चित्रपटाचे संगीत अकादमी पुरस्कार विजेते एम. एम. कीरावानी देणार आहेत.
‘बाहुबली: द बिगिनिंग’च्या घटनांनंतरची ही कथा आहे. विश्वासघात आणि हत्येनंतर अमरेंद्र बाहुबली मृत्यूनंतरच्या विश्वात पोहोचतो. तेथे देव आणि असुरांमधील प्राचीन वैश्विक युद्धात तो सहभागी होतो. १४ विश्वांचा प्रवास करताना तो नव्या साथीदारांसह विश्वाचा समतोल राखण्यासाठी संघर्ष करतो.




























































