
गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पीओके आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यासाठी हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पराक्रम गाजवला होता. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पराक्रमाची शर्थ करणाऱ्या हिंदुस्थानच्या 6 जवानांना वीरमरण आले होते. आता या जवानांची नावे सरकारने पहिल्यांदाज अधिकृतपणे जाहीर केली आहेत. या शूरवीर जवानांच्या नावांचा समावेश समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर्स’मध्ये करून ती दिल्लीतील स्मारकावर कोरण्यात आली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या 2025 या विभागातील Wall 3D वर या सहा वीर जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये लष्कर आणि वायुसेनेच्या जवानांचा समावेश आहे. रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू सेना पदक देण्यात आले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
सहा वीर जवानांची नावे
- सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय 10 इन्फंट्री ब्रिगेड
- रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र) – 4 जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री
- लान्स नाईक दिनेश कुमार – 5 फील्ड रेजिमेंट
- एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरलीनाईक – 851 लाइट रेजिमेंट
- हवालदार सुनील कुमार सिंग – 237 फील्ड वर्कशॉप कंपनी
- सार्जंट सुरेंद्र कुमार (वायू सेना पदक) – 39 विंग
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरीक ठार झाले होते. यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले होते. चार दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान हिंदुस्थानचे किती नुकसान झाले हे समोर आले नव्हते. यावेळी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेतील शहीदांची नावे किंवा इतर माहिती जाहीर केली नव्हती. आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर आणि स्मारकावर या नावांचा समावेश केल्यामुळे या मोहिमेत बलिदान देणाऱ्यांची ओळख देशसमोर आली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर 2.0’साठी सज्ज; गरज पडली तर… लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे विधान


























































