
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तनमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले होते. आता गरज पडली तर हिंदुस्थानचे सैन्य ऑपरेशन सिंदूर 2.0 साठीही पूर्णपणे तयार आहे, असा कडक इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे. ‘एएनआय’शी बोलताना द्विवेदी यांनी हे विधान केले आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शनिवारी पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 व्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाले. रिव्ह्यूइंग ऑफिसर म्हणून त्यांनी 355 कॅडेट अधिकाऱ्यांच्या परेडची सलामी घेतली. यावेळी कॅडेट्सनी मार्च पास्ट केला. फ्लाईपास्टमध्ये Su-30 MKI लढाऊ विमान, चेतक हेलिकॉप्टर, सारंग हेलिकॉप्टर एरोबॅटिक्स टीम आणि आकाशगंगा स्कायडायव्हिंग टीमने भाग घेतला.
#WATCH | Maharashtra | Indian Army Chief General Upendra Dwivedi reviews the Passing Out Parade (POP) of the 150th Course of the National Defence Academy march at the tri-services academy campus at Khadakwasla in Pune. The parade marks the commissioning of 355 cadets into the… pic.twitter.com/MudTfPMN5U
— ANI (@ANI) May 30, 2026
आधुनिक युद्ध पूर्णपणे पारदर्शक झाले आहे. 24 तास प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. अशा परिस्थितीत सैनिकांची तैनाती, ऑपरेशन्स आणि सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. युद्ध तेव्हाच जिंकता येते जेव्हा देशातील लोक माहिती देणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवतात. ज्या देशाचे नागरिक आणि संस्था एकमेकांवर विश्वास ठेवतात, तो देश नेहमीच मजबूत स्थितीत राहतो. जेव्हा युद्धाची गती खूप वेगवान होत असते, तेव्हा संसाधनांच्या मर्यादेत राहून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते जेणेकरून जलद निर्णय घेता येतील. अनेक तंत्रज्ञान आणि संसाधने हाताळण्यासाठी, ऑटोमेशनची गरज असते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते, असेही ते म्हणाले.
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी बदलत्या सुरक्षा आव्हानांवर चिंता व्यक्त केली. आजची सुरक्षा आव्हाने पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. आता धोके नेहमी जाहीरपणे समोरून येतील असे नाही. सध्याच्या ‘ग्रे झोन’ आणि ‘हायब्रीड’ युद्धाच्या काळात सैनिकांना अत्यंत वेगाने आणि चपळाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतील, असे ते म्हणाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे सिद्ध केले आहे की जेव्हा हिंदुस्थान प्रत्युत्तर देतो, तेव्हा ते अत्यंत अचूक आणि प्रभावी असते. आता हाच दर्जा नवीन कॅडेट्सना पुढे टिकवून ठेवायचा आहे, असेही द्विवेदी म्हणाले.





























































