आयुष्याचा शेवट स्वदेशातच व्हावा, हीच इच्छा…! 94 वर्षांच्या अमेरिकेतील आजींनी स्वीकारले हिंदुस्थानी नागरिकत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणूस जगभरात कुठेही गेला तरी, त्याचे आपल्या जन्मभूमीशी, स्वदेशाशी दृढ नाते असते. परदेशातही त्याला नेहमी स्वदेशाचीच आठवण होत असते. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी सध्या चर्चेचा विषय होत आहे. आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील ९४ वर्षीय कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा या आजींनी आपली दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग करून पुन्हा हिंदुस्थानी नागरिकत्व स्वीकारले आहे. आपले अखेरचे दिवस मातृभूमीत घालवणे आणि आपल्या मूळ गावीच आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व्हावेत, ही शेवटची इच्छा होती. त्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बापटला जिल्ह्यातील एका ९४ वर्षांच्या या आजींनी आपली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत अनेक वर्षे राहिल्यानंतर आणि तेथील नागरिकत्व मिळवल्यानंतर, त्यांनी पुन्हा हिंदुस्थानी नागरिकत्व मिळवले आहे. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मातृभूमीत घालवणे आणि आपल्याच गावात अंत्यसंस्कार होणे, ही सर्वात मोठी इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

महालक्ष्मम्मा या बापटला जिल्ह्यातील चिंतागुम्पाला गावच्या रहिवासी आहेत. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या मुलासह अमेरिकेत स्थायिक झाल्या. तिथे राहत असताना त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही मिळवले. तथापि, परदेशात अनेक वर्षे घालवूनही, त्यांचे मन त्यांच्या गावाशी आणि मायभूमीच्या आठवणीत होते.

काही काळापूर्वी, त्यांनी आपले हिंदुस्थानी नागरिकत्व पुन्हा मिळवण्यासाठी बापटला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. आपल्या अर्जात त्यांनी लिहिले होते की, आता त्यांची एकच इच्छा आहे की, आपला अखेरचा श्वास हिंदुस्थानातच घ्यावा आणि आपल्या मूळ गावीच अंत्यसंस्कार व्हावेत. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने त्यांचा अर्ज मंजूर केला. २४ जून रोजी बापटला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका समारंभात, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना निष्ठेची शपथ दिली आणि हिंदुस्थानी नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे सुपूर्द केली.

आपले भारतीय नागरिकत्व परत मिळाल्यानंतर महालक्ष्मम्मा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्यासाठी ही केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नव्हती, तर आपल्या मातीशी आणि मुळांशी पुन्हा जोडले जाण्याचा एक भावनिक क्षण होता.