
श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून आणि देणगीतून गायब झालेले 2 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये हे राजकारणात, निवडणुकांमध्ये आणि आमदार-खासदार विकत घेण्यासाठी वापरले गेले का? असा संशय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. हा 2 हजार कोटींचा आकडा केवळ प्राथमिक असून हा घोटाळा यापेक्षा खूप मोठा असू शकतो, असे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीचे म्हणणे असल्याचे सांगत राऊत यांनी सत्ताधारी शिंदे गटावर तोफ डागली. आता या हजारो कोटींच्या दानपेटी चोरीला सुद्धा त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ नाव देऊन आम्हीच पेट्या चोरल्याचे जाहीर करावे, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा पक्ष संत महात्म्यांचा आहे. हे सगळे संत, महात्मे वगैरे आहेत. त्यांचा राम मंदिरात वगैरे सहभाग आहे. त्यामुळे 2000 कोटींची चोरी तिथे झाली. हे सगळे त्यातलेच ना? दोन हजार कोटींमधील काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले? याचा आता तपास करावा लागेल. मग 2 हजार कोटी गेले कुठे? हे संत, महात्मे ज्यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात ते खासदारांना बसवून त्यांना वैकुंठाला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पाहा. पुष्पक विमानातील एका खासदाराच्या व्हायरल फोटोंचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले की, स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणवणारे एक खासदार कोणाच्या घरी किंवा हॉटेलमध्ये साधं पाणीही पीत नाहीत; पण 50 कोटी रुपये मिळताच त्यांचे जीवन कसे बदलले, हे चार्टर विमानातील फोटोंवरून स्पष्ट होते. पूर्वी कोकोकोला प्यायलाही ‘आमच्या पंथात चालत नाही’ म्हणून नकार देणारे हे खासदार त्या दिवशी विमानात समोर ‘रहस्यमय रंगीत पाण्याचा’ ग्लास ठेवून मस्त तरंगत बसले होते. 50 कोटी माणसाची निष्ठा, नियम आणि जीवन कसे बदलून टाकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. पुढे संजय राऊत म्हणाले की, 2 हजार कोटीपेक्षा जास्त पैशांचा बहार श्रीराम मंदिराच्या दानपेटी आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? यातला निधी निवडणूक खर्च किंवा आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला गेला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
‘त्या’ चांदीच्या विटेची पावती आजपर्यंत मिळालेली नाही
राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने सर्वात आधी 1 कोटी रुपयांचा चेक दिला होता आणि 25 किलोपेक्षा जास्त वजनाची पहिली चांदीची वीट अर्पण केली होती, अशी आठवण संजय राऊत यांनी करून दिली. मात्र, त्या चांदीच्या विटेची पावती आजपर्यंत मिळालेली नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मिंध्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा आणि निवडणूक लढवून दाखवावी
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला उशीर झाल्याची टीका करणाऱ्या मिंध्यांना संजय राऊत यांनी थेट आव्हान दिले. अमित शहा यांच्या मदतीने आमचा पक्ष आणि आमचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह चोरायचे आणि वरून आम्हांलाच ज्ञान शिकवायचे, या चोऱ्यामाऱ्या थांबवून मिंधेंनी आधी स्वतःच्या किंवा मुलाच्या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन करावा आणि निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले. त्यानंतर लागणाऱ्या निकालावरून त्यांनी भाष्य करावे; आता या चोरांना चोर म्हटले, की पुन्हा संजय राऊत बोलतात म्हणून ओरड सुरू होईल, असा टोला त्यांनी शेवटी लगावला.



























































