राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी ट्रस्टचे ‘कारभारी’ चंपत राय यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू याचाही अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. मात्र, मंदिराचे मुख्य कारभारी असलेले चंपत राय यांचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले आहे.

राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ट्रस्टने या प्रकरणी तक्रार दाखल केली तर उत्तर प्रदेश सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने 150 लोकांची चौकशी केली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर चौकशीचा प्राथमिक अहवाल नुकताच सादर केला.

सुमारे सात ते साडेसात कोटी रुपये बेपत्ता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या खात्यांमधून सुमारे सात ते साडेसात कोटी रुपये गायब झाल्याचा संशय आहे. मात्र, याबाबतच्या अधिकृत आकड्याची अजूनही प्रतीक्षा आहे.

शिवसेनेने दिलेली चांदीची वीटही गायब 

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट गायब झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.