
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्णराज महाडिक यांच्या अहिल्यानगर दौऱ्यातच भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. नगर दक्षिण युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर यांचा कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर फोटो नसल्याच्या कारणावरून भर बैठकीतच वाद झाला. या वादाचे रूपांतर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्यातील शाब्दिक खडाजंगीत झाले. अखेर संतप्त झालेल्या जिल्हाध्यक्षांनी आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकतो, अशी घोषणा करत कार्यकर्त्यांसह बैठकीतून वॉकआऊट केले. या घटनेने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयातील सभागृहात युवा मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष महाडिक यांचा अहिल्यानगर जिल्ह्याचा हा पहिलाच अधिकृत दौरा असल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर नियोजन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दौऱ्यादरम्यान स्वागत, फ्लेक्स, युवकांचा मेळावा किंवा भव्य रॅली यांचा अभाव जाणवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा सुरू होती.
बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर नगर दक्षिण युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर यांचा फोटो नसल्याने पदाधिकारी संतप्त झाले. आमचाच अपमान होत असेल तर आम्ही येथे कशासाठी थांबायचे? असा सवाल करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद अधिक चिघळल्यानंतर भालसिंग यांनी कार्यकर्त्यांसह सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहो.
या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, पदांवरील नाराजी आणि संघटनात्मक विस्कळीतपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. युवा मोर्चात काही विशिष्ट गटांनाच प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यात कार्यक्रमाच्या नियोजनातील त्रुटींमुळे कार्यकर्त्यांचा असंतोष आणखी तीव्र झाल्याचे बोलले जात आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या पहिल्याच अधिकृत दौऱ्यात पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्याने भाजप नेतृत्वाची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे. या प्रकाराची वरिष्ठांकडून दखल घेतली जाणार का, जबाबदारांवर कारवाई होणार का आणि नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढली जाणार का, याकडे आता भाजप कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

























































