तंबाखू अन् वेपिंगच्या फॅशनमुळे तरुणाईचे आरोग्य धोक्यात! ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते जीवावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखू आणि धूम्रपानाचे दुष्परिणाम माहीत असूनही देशात त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. याचे गंभीर परिणाम आता थेट तरुणांमध्ये दिसून येत आहेत. तोंडात येणारे पांढरे-लाल डाग, न बरे होणारे फोड किंवा घास गिळताना होणारा त्रास ही ओरल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. पूर्वी हा आजार पन्नाशीनंतर पाहायला मिळायचा. पण आता २५ ते ४५ वयोगटातील तरुण याचे बळी ठरत आहेत. यावर वेळेवर पाऊल उचलले नाही तर, हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

देशात ओरल कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्याबाबतची जागरूकता अजूनही खूप कमी आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. अनेक लोक तोंडातील फोड, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा तोंडातील इतर समस्यांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, जर तोंडातील एखादा फोड किंवा जखम दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी होत नसेल तर, त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ही लक्षणे ओरल कॅन्सरशी संबंधित असू शकतात आणि वेळेवर तपासणी न केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते केवळ तोंडातील फोडच नव्हे तर, तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल डाग दिसणे, अन्न चावताना वेदना होणे, कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज जाणवणे, दात सैल होणे, बोलताना किंवा गिळताना त्रास होणे ही देखील धोक्याची लक्षणे असू शकतात. याशिवाय तोंडातून सतत दुर्गंधी येणे किंवा तोंडाचा कोणताही भाग सुन्न पडणे याकडेही दुर्लक्ष करू नये. विशेषतः तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, प्रत्येक फोड म्हणजे कॅन्सर नसतो; सामान्य फोड 3 ते 4 दिवसांत बरे होतात. पण समस्या वाढल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणे गरजेचे आहे.

तरुणांमधील वाढता प्रादुर्भाव

पूर्वी ओरल कॅन्सर प्रामुख्याने 50 ते 75 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये दिसून यायचा, परंतु गेल्या काही वर्षांत हे चित्र झपाट्याने बदलले आहे. आता 25 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आणि वेपिंग (Vaping) करणाऱ्यांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपान, तंबाखू चघळणे, वेपिंग, अल्कोहोलचे सेवन आणि ओरल हायजीनची (तोंडाची स्वच्छता) काळजी न घेणे यांमुळे हा धोका वाढत आहे. जर ओरल कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर, उपचारांचे परिणाम खूप चांगले मिळतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असते.