
अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचा धडाका सुरूच आहे. मुदतबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी अमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमेझॉन रिटेल इंडियाच्या या गोदामाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सरलगाव येथील या गोदामात 24 जूनला ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर आणि त्यांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीदरम्यान गोदामात मानवी आरोग्यास घातक सुमारे दीड टन मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळला. तसेच, यापूर्वी गोदामातील मुदतबाह्य अन्नपदार्थ कोठे आणि कसे नष्ट केले याचा कोणताही पुरावा किंवा तांत्रिक नोंद कंपनीला सादर करता आली नाही.
एजन्सी मालकावर गुन्हा
अमेझॉन रिटेल इंडियाने मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी आर.के. ट्रेडर्सची नियुक्ती केली होती. मात्र, हा साठा नियमबाह्य पद्धतीने बाजारात पोहोचवल्याप्रकरणी एजन्सीचे मालक रहमान के. आणि अमेझॉन रिटेल इंडियाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर कोनूर यांच्याविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ-10 चे सहाय्यक आयुक्त आणि परवाना अधिकारी योगेश ढाणे यांनी अमेझॉन रिटेल इंडिया या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित केला.





























































