
अयोध्येतील राममंदिर देणगी चोरीप्रकरणी आठ आरोपींना अटक केल्यानंतर आज अखेर श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला, तर विश्वस्त अनिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय मंदिर निर्माण प्रभारी गोपाल राव यांनाही मंदिर व्यवस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लवकरच ट्रस्टची फेररचना करण्यात येणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देणगी चोरीप्रकरणी राम शंकर यादव ऊर्फ टिनू, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, करुणेश पांडे, अविनाश शुक्ला, मनीष यादव, राम शंकर मिश्रा आणि सुभाष चंद्र श्रीवास्तव यांना गुरुवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. एसआयटीने 23 जून रोजी अहवाल सादर केला. त्यानंतर 25 जून रोजी अटकेची पहिली कारवाई करण्यात आली. अनुकल्प आणि लवकुश मिश्रा हे अनिल मिश्रा यांचे नातेवाईक असून टिन्नू यादव व चंपत राय यांचा चालक आहे. मनीष यादव हा टिन्नू यादवचा पुतण्या आहे. मात्र एफआयआरमध्ये बडय़ा लोकांची नावे नसून त्यांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामेदेखील चौकशीसोबत जोडले जात आहेत.
ट्रस्टची फेररचना होणार
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची लवकरच फेररचना करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ट्रस्टमध्ये एक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांना सीईओ म्हणून नियुक्त करण्यात येऊ शकते.
श्री रामजन्मभूमी ट्रस्ट बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी
काँग्रेसने या प्रकरणावरून भाजप आणि आरएसएसवर टीका करताना म्हटले की, देणग्यांची चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर स्वतःला हिंदुत्वाचे रक्षक म्हणवून घेणाऱ्यांचे पितळ पूर्णपणे उघड पडले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.
एफआयआर केवळ दिखावा, बडय़ा राक्षसांना वाचवण्याचा प्रयत्न – केजरीवाल
देणगी चोरीप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरवरून ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. प्रभू श्रीरामांचे दागिने, हार, पादुका, सोने-चांदी, हिऱ्यांचे दान तसेच कोटय़वधी रुपयांच्या रोख देणगीवर दरोडा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात मोठमोठे राक्षस सामील आहेत. एफआयआर केवळ दिखावा असून मोठय़ा राक्षसांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे.
अशी व्हायची देणगीची चोरी
एसआयटीच्या तपासात या देणगी चोरीबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मंदिराच्या एकेका दानपेटीत एकेकाळी सहा-सात लाख रुपये जमा व्हायचे. मात्र त्यातील 500 रुपयांच्या नोटा कमी होत असल्याचे आढळल्यानंतर मोजणी करणाऱ्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यांनाही चोरांनी फसवले. मोजणीच्या वेळी काही कर्मचारी कॅमेऱ्यासमोर उभे राहायचे आणि दुसरा सहकारी नोटांची बंडले कपडय़ांमध्ये लपवायचा. ही रक्कम बाथरूममध्ये लपवून ठेवायचे. संधी मिळताच ही बंडले मंदिराबाहेर न्यायचे आणि त्यानंतर रकमेचे वाटप व्हायचे. अटक करण्यात आलेले आरोपी या प्रक्रियेत होते आणि त्यांची नियुक्ती शिफारसींवरूनच झाली होती, असे तपासात उघड झाले आहे.
शिवसेनेने दान केलेली चांदीची वीट गायब
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने 4 किलो वजनाची चांदीची वीट आणि एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. ही वीट गायब आहे. यावरून शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत चांदीची वीट आणि एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. एवढी वर्षे झाल्यानंतरही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती देण्यात आलेली नाही. ही वीट गेली कुठे? यासंदर्भात सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी ‘एक्स’वर केली आहे.
79 लाख हस्तगत
अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून 79.85 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसबीआयचेदेखील काही कर्मचारी सहभागी असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली.
भाजपची लंका अयोध्येतच जळणार – अखिलेश यादव
श्रीराम मंदिर देणगी चोरीवरुन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून त्यांनी मोदी आणि योगी सरकारला लक्ष्य करताना म्हटले, की अखेर दानभक्तांचा मुखवटा उतरला. प्रभूच्या अलौकिक शक्तीने चमत्कार दाखवून दिला. आता भाजपच्या लोकांच्या अहंकाराच्या चकाकणाऱ्या लंकेच्या साम्राज्याचाही अस्त होणार आणि लंकाधिपतीचादेखील. भाजपसाठी अमृतकाल काळ बनून आला आहे. भाजपची लंका अयोध्येतच जळणार आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.




























































