सामना अग्रलेख – सकल हिंदू समाज; अहो उठा, मंदिर लुटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राममंदिर हा भारतीय जनतेचा आत्मा आहे. याच राममंदिराने हिंदुत्वाला जाग आणली. त्यामुळे राममंदिराची लूट हा सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाचा विषय ठरायला हवा. तो का झाला नाही? या चोरी प्रकरणात टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा नामक किरकोळ लोकांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली आहे. आता हे टिन्नू, मिश्रा वगैरे लोक हिंदू नसून मुसलमान आहेत आणि त्यांनी हिंदूंची खोटी नावे धारण करून मंदिरांची लूट केली अशी अफवा पसरवून कोणीतरी राममंदिर बचाव लढाईस तोंड फोडले पाहिजे. कारण जोपर्यंत राममंदिर लुटीत एखादे मुसलमान नाव येत नाही, तोपर्यंत फडणवीस, मिंधे, मोदी, शहा त्यांनी निर्माण केलेला सकल हिंदू समाज हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवणार नाही.

हाराष्ट्रात सकल हिंदू समाज नावाने अधूनमधून विविध उपक्रम सुरू असतात. हिंदूंच्या नावाने जरा कोठे ‘खट’ झाले की, सकल हिंदू समाज हिंदुत्वाचा अपमान झाल्याची बोंब मारत रस्त्यावर उतरतो, पण अयोध्येच्या राममंदिरातील देणग्या, दानपात्र, चांदीच्या वस्तूंची ‘लूट’ झाल्याचे समोर येऊनही हा ‘सकल हिंदू समाज’ शांतपणे पडून राहिला आहे. अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटले आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाने स्वतःचे तोंड व डोळे बंद करून घेतले आहेत. महाराष्ट्रात व भारतात अनेक ठिकाणी ‘सकल हिंदू समाज’नामक संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या संघटनेचा कोणी एक नेता नाही. सकल हिंदू समाजाला एका मंचावर, एका छत्राखाली आणण्यासाठी सभा, संमेलने, मोर्चे वगैरेंचे आंदोलन हे लोक करतात. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्याविरुद्ध आंदोलन’ हे त्यांचे प्रिय विषय आहेत. म्हणजे एखाद्या मंदिराचा, मशिदीचा वाद उकरून काढायचा व तेथे ‘सकल’वाल्यांनी पोहोचायचे व तणाव निर्माण करायचा हे ‘सकल’वाल्यांचे छंद आहेत, पण हिंदू समाज फक्त या अशाच घटनांमुळे खतऱ्यात येतो काय? महाराष्ट्र हे ‘नीट’ पेपरफुटीचे मुख्य केंद्र बनले. या प्रकरणात महाराष्ट्रातून साधारण आठ-दहा जणांना अटक केली गेली. त्यात पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे, तेजस शाह, मनीषा हवालदार, शिवराज लोखंडे, शुभम खैरनार, कोचिंग क्लासवाले शिवराज मोटेगावकर असे जे लोक पकडले ते सर्व प्रखर हिंदुत्ववादी व

भाजपशी संबंधित

हेत. या सगळय़ांमुळे सकल हिंदूंच्या पोराबाळांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अनेकांनी तर आत्महत्या केल्या. या प्रकरणी हिंदू हितरक्षणार्थ सकल हिंदू समाजाचे लोक रस्त्यावर आले असे दिसले नाही. प. बंगालात भाजप सरकार सत्तेवर येताच गायी कापण्याची परवानगी देण्यात आली. गाय 14 वर्षांची असेल तर खुशाल कापा असे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. म्हणजे गाय 14 वर्षांनंतर गोमाता राहत नाही काय? या गोहत्येविरुद्ध सकल हिंदू पुढाऱ्यांनी प. बंगालात मोर्चे वगैरे काढले नाहीत. मध्य प्रदेशच्या हिंदू मुख्यमंत्र्यांनी हिंदूंचेच तीर्थक्षेत्र उज्जैन, भगवान महाकालची लूट केली. हिंदू श्रद्धेवर आघात झाल्यामुळे ‘महाकाल बचाव’साठी फडणवीस मंत्रिमंडळातील ‘टिल्लू’, ‘सकल हिंदू’ पुढारी वचवच करताना अद्यापि दिसलेले नाहीत. अयोध्येतील राममंदिराची लूट तर सकल हिंदू समाज आंदोलकांपुढचे आव्हान आहे. राममंदिर लुटीविरुद्ध सकल हिंदूंचे महाराष्ट्रातील सर्व ढोंगी पुढारी हात चोळतच तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत. राममंदिर ट्रस्टमध्ये हिंदुत्वाचे मारेकरी व श्रीरामाचे शत्रू बसले आहेत. चोरीच्या तपासासाठी एका एसआयटीची स्थापना झाली. त्यांच्या अहवालानंतर आठ जणांवर गुन्हे दाखल झाले, पण मुख्य संशयित चंपत राय व एकाही ट्रस्टीला जाब विचारला गेला नाही. (आता या लोकांनी म्हणे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ही रंगसफेदी आहे.) म्हणजे सरकारने

मुख्य चोर मंडळास

वाचवले. अयोध्येत मंदिराशी व भाजपशी संबंधित लोकांनी आधी अत्यल्प किमतीत जमिनी खरेदी केल्या व नंतर राममंदिर ट्रस्टशी हातमिळवणी करून अनेक पट जास्त किमतीत या जमिनी ट्रस्टलाच विकत दिल्या. या व्यवहाराचे सर्व पुरावे ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी ‘एसआयटी’ला दिले, पण त्याचा तपास झाला नाही. राममंदिर हा भारतीय जनतेचा आत्मा आहे. याच राममंदिराने हिंदुत्वाला जाग आणली. या राममंदिरामुळे गुजरातमध्ये ‘साबरमती’ पेटवून गोध्राकांड घडवले. त्यातून नरेंद्र मोदींचा राजकीय उदय झाला. त्याच रामाचे अन्न आजही खाल्ले जात आहे. त्यामुळे राममंदिराची लूट हा सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाचा विषय ठरायला हवा. तो का झाला नाही? या चोरी-दरोडय़ात कोणा मुसलमानाचा हात नसल्याने सकल हिंदू समाजाला जाग येत नाही काय? हा प्रश्न आहेच. या चोरी प्रकरणात टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा नामक किरकोळ लोकांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली आहे. आता हे टिन्नू, मिश्रा वगैरे लोक हिंदू नसून मुसलमान आहेत आणि त्यांनी हिंदूंची खोटी नावे धारण करून मंदिरांची लूट केली अशी अफवा पसरवून कोणीतरी राममंदिर बचाव लढाईस तोंड फोडले पाहिजे. कारण जोपर्यंत राममंदिर लुटीत एखादे मुसलमान नाव येत नाही, तोपर्यंत फडणवीस, मिंधे, मोदी, शहा व त्यांनी निर्माण केलेला सकल हिंदू समाज हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवणार नाही. सकल हिंदू समाज कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे व अस्वस्थ राम भगवान सहकुटुंब वनवासी निघाले आहेत!