
>> गणेश राख
जगभरात २६ जून हा दिवस ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. विविध स्तरांवर जनजागृती केली जाते. पुणे पोलिसांकडूनही ‘ड्रग्ज फ्री सिटी’चा नारा देत मोहीम राबविली जात आहे. मात्र, वास्तव वेगळेच आहे. शहरात जवळपास दर आठवड्याला गांजा, मेफेड्रॉन (एमडी), कोकेन किंवा इतर अमली पदार्थ जप्त केल्याच्या घटना समोर येतात. पोलिसांच्या कारवाया सुरू असल्या, तरी ड्रग्जची आवक आणि पुरवठा थांबलेला नाही. त्यामुळे ‘ड्रग्ज फ्री सिटी’ हे उद्दिष्ट अद्याप कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
पुणे हे राज्यातील शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी, आयटी व्यावसायिक आणि युवक येथे वास्तव्यास आहेत. या लोकसंख्येचा गैरफायदा घेत ड्रग्जची मागणी वाढत आहे. कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, बाणेर, खराडी, कोंढवा, हिंजवडीसारख्या भागांतील काही पार्ष्या, पब आणि खासगी समारंभांमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी विशेष पथके आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला संशयित विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, कारवाईत सातत्याचा अभाव आणि मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचण्यात येणारे अपयश, यामुळे ड्रग्जची साखळी तुटताना दिसत नाही. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत. मात्र, संपूर्ण शहरात एकसमान आणि सातत्यपूर्ण मोहीम दिसून येत नाही. जनजागृतीसोबत कठोर अंमलबजावणी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविल्याशिवाय परिस्थितीत बदल होणे कठीण आहे. ड्रग्जविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नाही. पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
ड्रग्जविरोधी लढ्यातील आव्हाने काय?
- मुख्य पुरवठादारांपर्यंत तपास पोहोचत नाही.
- पेडलर अटक झाला तरी दुसरा लगेच सक्रिय होतो.
- आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू करतात.
- आंतरराज्यीय ड्रग्ज साखळी मोडण्यात अपयश.
- जनजागृतीबरोबर सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाईची गरज.



























































