
हिंदुस्थानात अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा टॉप कमांडर गाझी मुमताझ याचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला आहे. तो ‘लष्कर’चा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदचा अतिशय जवळचा मानला जात होता.
गाझी मुमताझ हा पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात अपर दिर येथील बाराहवाला येथील रहिवासी होता. त्याने हिंदुस्थानात अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या. त्याच्यावर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. तो दीर्घकाळ जम्मू-कश्मीरमध्ये सक्रिय होता; मात्र सुरक्षा दलांच्या कारवाईच्या भीतीने तो पाकिस्तानात पळून गेला होता. तेथे तो हाफीज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या संरक्षणात वास्तव्यास होता.




























































