
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संघाचे गुणगान केले होते. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केले. तुमची सद्सदविवेकबुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण ठेवू नका, अशा शब्दात राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत नांगरे पाटील यांना खडेबोल सुनावले. पोलीस अधिकाऱ्यांची निष्ठा ही केवळ त्यांच्या कर्तव्याशी आणि पोलीस दलाशी असली पाहिजे, मात्र विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊन संघाचे आणि त्यांच्या संस्थापकांचे केलेले कौतुक हे एका सरकारी अधिकाऱ्याच्या निष्पक्ष भूमिकेला साजेसे नाही. ‘नांगरे पाटील यांना संघाविषयी आपुलकी असेल तर ती मनात ठेवा. जाहीरपणे व्यक्त करायची असेल तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करा,’ असा सल्ला राज ठाकरे यांनी दिले.



























































