
शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ठेकेदाराकडून 40 लाख रुपये घेत असल्याचा आणि ‘वरिष्ठांनाही द्यावे लागते,’ असे म्हणतानाचा एक खळबळजनक व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत उजेडात आणला. ‘हे एक प्रकारे ‘ऑपरेशन लांडगा’ असल्याचा हल्लाबोल करत, या व्हिडीओतील ‘तो’ ठेकेदार आता जिवंत असेल का?’ असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही इंगवले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘येत्या 15 दिवसांत क्षीरसागर यांचा आणखी एक भ्रष्टाचाराचा व्हिडीओ बाहेर काढणार आहे. त्यामुळे जिह्यात आमदार क्षीरसागर यांच्यासारख्या भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा,’ अशी मागणीही इंगवले यांनी केली.
रविकिरण इंगवले म्हणाले, ‘राजेश क्षीरसागर यांनी अफाट माया गोळा केली आहे. कॉण्ट्रक्टर, डॉक्टर, उद्योगपतींना धमकावणे, ‘टक्केवारी’चे व्यवहार करणे आणि लाखोंचे इमले उभारत शासनाबरोबरच कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या जागा बळकवणे हाच क्षीरसागर यांचा एककलमी कार्यक्रम आहे. आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेले आमदार क्षीरसागर हे पुन्हा एकदा ठेकेदाराकडून लाखो रुपये उकळताना ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये सापडले आहेत. ‘टक्केवारी’ घेतल्याशिवाय ते कामच करत नाहीत. 100 कोटींचे रस्ते, जयप्रभा स्टुडिओ हडपण्यासह तत्कालीन आयपीएस महिला अधिकाऱ्याचे विनयभंग प्रकरण पाहता, जिह्यात एवढा बदनाम आमदार दुसरा कोणी नाही,’ अशी टीकाही इंगवले यांनी यावेळी केली.
संबंधित व्हिडीओमध्ये ठेकेदाराकडून आमदार क्षीरसागर 40 लाख रुपये घेत असल्याचे दिसून येते. ही रक्कम कुठल्या प्लॉट खरेदीची नसून, ‘वरिष्ठांना द्यावे लागते…’ असे क्षीरसागर यांचे वाक्य पाहता, निश्चितच ही शासकीय कामांसंदर्भातील ‘टक्केवारी’ असल्याचा आरोप करत, ‘याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चौकशी केल्यास सत्य समोर येईल,’ असे इंगवले म्हणाले. ‘सध्या पोलीस संरक्षणात हे आमदार फिरत आहेत. पण ज्या दिवशी त्यांची चौकशी होईल, त्यावेळी कोल्हापुरी पायताण घेऊन जनता त्यांना मारायला पुढे येईल. त्यावेळी आपणही सर्वांत पुढे असू,’ असे सांगत, 15 दिवसांत क्षीरसागर यांच्या संदर्भातील आणखीन एक व्हिडीओ बाहेर येणार असल्याचा इशाराही इंगवले यांनी दिला. ‘प्रत्येक फोन ‘अर्थपूर्ण’ असल्याने शासकीय अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी क्षीरसागर यांच्यापासून वेळीच सावध राहावे; अन्यथा त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागेल,’ असा आवाहनवजा इशाराही इंगवले यांनी दिला.
2008 प्रकरणाची फेर चौकशी कराच
– ‘आमदार क्षीरसागर यांना सगळे खून करणारेच जवळ लागतात. त्यांनाच ते खतपाणी घालतात आणि निवडणुकीतही उतरवतात. त्यामुळे 2008मधील खून प्रकरणाची पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी करावी,’ असे आवाहन करत, ‘याप्रकरणी शिंदे गटाचे सध्याचे निवडून आलेले नगरसेवक, तसेच मटका प्रकरणात जामिनावर असलेले आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सम्राट कोराने यांच्यासह आमदार क्षीरसागर यांचीही चौकशी करावी,’ असे थेट आव्हानच रविकिरण इंगवले यांनी दिले.






























































