
उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून युकेमध्ये (UK) शिकण्यासाठी गेलेल्या तेलंगणातील एका 25 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयित मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एस. श्रीनाथ रेड्डी असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून, तो कामारेड्डी जिल्ह्यातील तालामडला गावचा रहिवासी होता. 14 महिन्यांपूर्वी श्रीनाथ उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथ लेस्टर येथील ‘डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी’मधून (De Montfort University) त्याचे पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स डिग्री) पूर्ण करत होता. 22 जूनच्या रात्री श्रीनाथने आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता, तेव्हा त्याच्या बोलण्यातून कोणतीही असामान्य गोष्ट जाणवली नव्हती. कुटुंबीयांशी बोलल्यानंतर तो त्याच रात्री एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता.
दुसऱ्या दिवशी, 23 जूनच्या सकाळी श्रीनाथच्या रूममेटला तो मृत अवस्थेत आढळला. रूममेटने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रीनाथने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. युकेमधील स्थानिक प्रशासनाकडूनही या प्रकरणावर अद्याप अधिकृतपणे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
श्रीनाथच्या निधनाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मित्र आणि ओळखीच्या लोकांद्वारे मिळाली. त्याचे वडील मधुसूदन रेड्डी यांनी मुलाच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करण्याची आणि त्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार तसेच तेलंगणा सरकारकडे तातडीने मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, श्रीनाथचा मृतदेह भारतात पाठवण्याचा खर्च उचलण्यासाठी त्याच्या चुलत भावांनी ‘गो फंड मी’ (GoFundMe) या पेजद्वारे निधी उभारून मदतीचे आवाहन केले आहे.



























































