
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एआय फोटोमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते ग्रीक पौराणिक पात्र अॅटलसप्रमाणे एका गुडघ्यावर बसून संपूर्ण पृथ्वी आपल्या खांद्यावर पेलताना दिसत आहेत. त्यांच्या शरीराभोवती अमेरिकेचा ध्वजही गुंडाळलेला आहे. आता त्यांच्या या AI फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक एआय-निर्मित फोटो शेअर केला आहे. ग्रीक पौराणिक पात्र अॅटलसप्रमाणे त्यांनी संपूर्ण पृथ्वी आपल्या खांद्यावर पेलल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
ट्रम्प यांनी या फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नसल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क करत यावर चर्चा होत आहे. ग्रीक पौराणिक कथेनुसार ॲटलास हा प्रचंड शक्तिशाली होता. देवांविरुद्धच्या युद्धात पराभव झाल्यानंतर, त्याला कायमस्वरूपी जगाचे म्हणजेच पृथ्वीचे ओझे आपल्या खांद्यावर पेलण्याची शिक्षा देण्यात आली. त्यामुळे, आजही ॲटलासचा वापर अनेकदा जड ओझे किंवा मोठी जबाबदारी यांचे प्रतीक म्हणून केला जातो.
ट्रम्प यांनी या प्रतिमेला कोणतेही कॅप्शन दिले नाही, तसेच त्याचा स्पष्ट अर्थही उघड केला नाही. त्यामुळे विविध तर्क लावत याचा अर्थ काढण्यात येत आहे. स्वतःला एक शक्तिशाली जागतिक नेता म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रतिमेत ट्रम्प स्वतःला संपूर्ण जगाचे ओझे सांभाळू शकणारे नेते म्हणून दाखवत असल्याचे दिसते. त्यांचे समर्थक याकडे शक्तिशाली नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पाहत आहेत.
अॅटलास केवळ सामर्थ्याचेच नव्हे, तर प्रचंड जबाबदारीचेही प्रतीक आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की, या प्रतिमेद्वारे ट्रम्प यांना असा संदेश द्यायचा आहे की, ते जगातील मोठी संकटे हाताळण्यास सक्षम आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ट्रम्प बऱ्याच काळापासून स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे आता असे व्हिज्युअल ब्रँडिंग आणखी सोपे झाले आहे. ही प्रतिमा देखील त्याच रणनीतीचा एक भाग मानली जाते.
एआय प्रतिमा समोर आल्यानंतर इंटरनेटवर एक चर्चा सुरू झाली. अनेकांनी याला अहंकार आणि आत्मप्रचाराचा प्रयत्न म्हटले. काही वापरकर्त्यांनी म्हटले की, स्वतःला जगाचा भार वाहणारा नेता म्हणून चित्रित करणे हा एक राजकीय संदेश देण्याचा मार्ग आहे.
ट्रम्प यांनी एआय-निर्मित किंवा डिजिटल पद्धतीने तयार केलेली प्रतिमा शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही असाधारण किंवा ऐतिहासिक व्यक्तींशी संबंधित अनेक प्रतिमा शेअर केल्या आहेत. सध्या, ट्रम्प किंवा व्हाईट हाऊसने ॲटलसची एआय प्रतिमा शेअर करण्यामागील आपला हेतू अधिकृतपणे सांगितलेला नाही.























































