
सोने आणि चांदीच्या दरात या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. तसेच महिन्याभरातही या दोन्ही धांतूमध्ये घसरण दिसून येत आहे. सोन्या-चांदीतील या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोने खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत दबाव पाहायला मिळात आहे. युद्ध संपल्यावर या धातूंच्या किमतीत वाढ अपेक्षित होती. पण जूनच्या महिन्याभरात सोन्या आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आली गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
देशांतर्गत फ्युचर्स बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत एका महिन्याभरात 17000 रुपयांनी घसरली, तर 29 मे पासून सोन्याचा वायदा दर 10.36 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, सोन्यापाठोपाठ चांदीची किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. जून महिन्यात चांदीच्या दरात 51000 रुपयांची, म्हणजेच 18.56% घट झाली असून या लक्षणीय घसरणीनंतर गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.
इराण आणि अमेरिकेने युद्ध थांबवून पश्चिम आशियात परिस्थिती सामान्य करण्यासाठी ‘शांतता करारा’वर स्वाक्षरी केल्या, ज्यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत वाढ अपेक्षित होती. पण इकडे युद्ध थांबताच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निवेदनामुळे घसरणीचा जोर वाढला. फेड रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष केविन वॉर्श यांनी यावर्षी व्याजदर वाढण्याचे संकेत दिले, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरणीचा कल सुरू झाला.
जागतिक बाजारात अनेक तज्ज्ञ फेड रिझर्व्हच्या पुढील बैठकीत व्याजदर वाढीचा अंदाज वर्तवत असून यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे. याशिवाय आधीच उच्चांकी शिखरावर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गुंतवणूक करणारे आता नफावसूली करून सुरक्षित मालमत्तेऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक वाढवत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमतीतील घसरण आणखी तीव्र झाली, असे तज्ज्ञांनी सांगितले. सोन्याची किंमत सर्वकालीन उच्चांकावरून अंदाजे 29% घसरली आणि 4000 डॉलरच्या खाली आली. तर, चांदीची किंमतही 50% पेक्षा जास्त घसरणीसह सुमारे 57 डॉलरवर कमी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन केल्यापासून सोन्याच्या दरात १३,००० रुपयांहून अधिक आणि चांदीच्या दरात जवळपास ४६,००० रुपयांची घट झाली आहे. १० मे रोजी जेव्हा मोदींनी हे आवाहन केले, तेव्हा २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,५३,१४० रुपये होता, तर चांदीचा भाव प्रति किलो सुमारे २,६२,३५० रुपये होता.
२८ जूनपर्यंत सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,३९,८७३ रुपयांपर्यंत खाली आले, तर चांदीचे भाव प्रति किलो २,१६,५४१ रुपयांपर्यंत घसरले; म्हणजेच अनुक्रमे १३,२६७ रुपये आणि ४५,८०९ रुपयांची घट झाली.
हिंदुस्थान हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थान मोठ्या प्रमाणावर परदेशातून होणाऱ्या खरेदीवर अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावरील आयातीमुळे डॉलरचा ओघ बाहेर जातो आणि व्यापार तूट (trade deficit) वाढू शकते.
सोमवार ते गुरुवार सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र, शुक्रवारी वायदे बाजारात सोने-चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन, अमेरिका-इराणमधील थांबलेले युद्ध आणि फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचा वर्तवलेला अंदाज यामुळे या दोने धांतूमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या किरकोळ वाढीनंतर गुंतवणूकदारांचा संभ्रम आणखी वाढला आहे.
























































