
आयटी क्षेत्रात नव्या भरतीची लाट आल्याचे समोर आले आहे. देशातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएलटेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांनी जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत एकूण 13,918 कर्मचाऱ्यांची निव्वळ भरती केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सत्रात एकूण 24,398 फ्रेशर्स उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. सप्टेंबर तिमाहीतील भरतीत एचसीएलटेकने सर्वाधिक कर्मचारी भरती केली. एचसीएलटेक 6,450, टेक महिंद्रा 5,446, इन्फोसिस 4,480 आणि टीसीएसने 4,258 कर्मचाऱयांना नोकरी दिली आहे. विप्रो वगळता उर्वरित सर्व चार दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. विप्रोमध्ये मात्र 6,716 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. इन्फोसिसचे चालू वर्षात 20,000 पदवीधरांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट असून त्यांनी 12,000 उमेदवारांना ऑफर्स दिल्या आहेत.
हजारो फ्रेशर्सला संधी
टीसीएसने सप्टेंबर तिमाहीत जगभरातील 10,000 फ्रेशर्सना कंपनीत नोकरीवर घेतले आहे. पहिल्या तिमाहीतील 14,000 फ्रेशर्ससह पहिल्या सत्रात टीसीएसने एकूण 24,000 तरुणांना कॅम्पस सिलेक्शनमधून संधी दिली आहे. एचसीएलटेकने या तिमाहीत 6,136 फ्रेशर्सची भरती केली आहे. यातील 15 टक्के उमेदवार ‘एलिट इंजिनिअर’ श्रेणीतील आहेत. चालू वर्षात 10,000 ते 11,000 फ्रेशर्सची भरती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

























































