समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील वॅगनआर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील भागावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील जीवने कुटुंबीय एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी वॅगनआर कारने अकोल्याकडे जात होते. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 105+700 जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील भागावर जाऊन आदळली.

या अपघातात महादेव जीवने, भास्कर जीवने, आरती जीवने, लता जीवने आणि त्रिशा जीवने (सर्व रा. बाबूपेठ, चंद्रपूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, ज्या कंटेनरवर कार आदळली तो कंटेनर ‘नो पार्किंग’ क्षेत्रात रस्त्याच्या कडेला उभा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अवैध पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, कंटेनर नेमका कोणत्या परिस्थितीत तेथे उभा होता, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

या हृदयद्रावक घटनेची माहिती चंद्रपूरमधील बाबूपेठ परिसरात पोहोचताच शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अकाली मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरधाव वेग, चालकाचा थकवा, निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन करून रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी अवजड वाहने ही अशा अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करून अवैध पार्किंगवर प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.