
श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या 8 आरोपींच्या घरांवर पोलिसांनी आज एकाच वेळी छापे मारले. तीन आरोपींच्या घराला कुलूप लागले होते, तर अनुकल्प मिश्रा याच्या घरातून एक डायरी आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यातून देणगी चोरीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून त्यातून आणखी नावे समोर येऊ शकतात.
पोलिसांच्या 8 पथकांनी रविवारी सकाळी 7 वाजता आरोपींच्या घरांवर छापे मारले. चंपत राय याचा चालक रामशंकर ऊर्फ टिन्नू यादव याच्या घरी कुलूप लागले होते. इतर दोन आरोपींच्या घरीदेखील कुलूप होते. मात्र अनुकल्प मिश्रा याच्या घरातून महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. पोलिसांनी त्याच्या घरातून एक डायरी जप्त केली आहे. याशिवाय इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राम मंदिराच्या कामात सहभागी झाल्यानंतर आरोपींच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल आल्याचे आढळले असून त्याबाबतही तपास करण्यात येत आहे. आरोपींनी खरेदी केलेली संपत्ती व बँक खात्यांचा तपशीलदेखील पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. छाप्यांमध्ये महसूल अधिकारी तसेच सीएंना सहभागी करण्यात आले होते. त्यांच्यामार्फत सर्व तपशील तपासण्यात येणार आहे.
कोणाकडे काय सापडले…
टिन्नू यादव याच्या घराला कुलूप होते. त्याची आई काही वेळानंतर आली आणि घर उघडले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. अविनाश शुक्ला, सुभाष श्रीवास्तव व मनीष यादव यांच्या घरालाही कुलूप होते. रमाशंकर मिश्रा याच्या घरी पोलिसांनी कपाट व इतर ठिकाणी तपासणी केली. त्याच्या घरातून काहीही सापडले नाही. पोलिसांची सर्वांच्या शेजाऱयांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
डायरीतून होणार पर्दाफाश
ही डायरी राम मंदिर देणगी चोरीशी संबंधित असून त्यात देणगीचे चोरलेले पैसे व इतर वस्तूंचा हिशोब ठेवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरी केलेली रक्कम व वस्तूंचे कोणाला वाटप करण्यात आले किंवा वस्तूंची कशी विल्हेवाट लावण्यात आली, यात कोणाकोणाला किती वाटा मिळाला, कोणकोण सहभागी होते याची माहिती या डायरीतून मिळेल, असे त्रांनी सांगितले.



























































