विज्ञान रंजन – पावशा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

अनेक पशु-पक्ष्यांना नैसर्गिक बदलांची त्वरित जाणीव होते. ऋतुमानातील संभाव्य बदल अशा कीटक, प्राणी-पक्षी यांच्या ‘वागणुकी’तून टिपण्याची क्षमता गेल्या शतकापर्यंत माणसांमध्येही होती. काळय़ा मुंग्या किंवा क्वचित मातीतून वर येणारी गांडुळं दिसायला लागली की पावसाची चाहूल लागली असं लोक म्हणत. उन्हाळय़ात लाल मुंग्या कुठून तरी उत्पन्न होऊन अन्नाचे सूक्ष्म कण ‘मुखगत’ करून शिस्तीने रांगेत चाललेल्या दिसत. धान्यकणांचा भुगा करणाऱया सूक्ष्म कीटकांनी त्यांचं बरंचसं काम आधीच केलेलं असे. मग ते कण स्वतः बनवलेल्या वारुळ नावाच्या ‘महालात’ नेऊन ‘राणी मुंगीला’ नजराणा दिला जात असे. आजही गावखेडय़ातील जमिनीसलग असलेल्या घरांमध्ये मुंग्यांची रांग दिसतेच.

मात्र काळ्या मुंग्या, बेडूक, वगैरेंचं पहिलं दर्शन पावसाचा अंदाज देत असे. सभोवतालच्या निसर्गाशी नातं जोडून जगणाऱया माणसांनीही त्यातून काही आडाखे बांधून आपली मतं बनवली तर नवल नाही. यामध्ये ठरावीक प्रजातीच्या पक्ष्यांचाही समावेश असायचा. आजही त्यांचं (क्वचित) दर्शन शहरी भागातील हिरवाईच्या परिसरातसुद्धा होतं.

हा लेख वाचताना सर्वांनाच सुखद पावसाळय़ाचा अनुभव येत असावा अशी अपेक्षा. कारण ‘अल निनो’ काय करेल सांगत येत नाही. यावेळी उन्हाळी पक्ष्यांनी वेळेवर आगमन केलं. महानगरातल्या विशाल पाणवठय़ावर ‘फ्लेमिंगो’ सालाबादप्रमाणे आले आणि आम्रतरूंवर कोकीळ स्वरही निनादला.

पण पावसाचं आणि पावशाचं (किंवा पावश्या) काय? या वर्षीही त्याने नेहमीप्रमाणेच पावसाच्या आगमनाची वर्दी दिली का? मोठय़ा शहरातील आवाजी प्रदूषणात त्याचा स्वर कुठे कानी पडला नाही म्हणून ही शंका. त्यात आणि ‘अल निनो’ची धास्ती! पण पावसाच्या निमित्ताने ‘पावशा’ची वैज्ञानिक, रंजक माहिती घ्यायला काय हरकत आहे? पावशाप्रमाणेच पाण्याच्या थेंबाची प्रतीक्षा करणारा चातक आणि पावसाळी ढगांची दाटी पाहून पावसाला केकारव करत साद घालत बेभान नाचणारा मोर हेसुद्धा पर्जन्यप्रेमी पक्षी. त्यांच्याविषयीची माहितीही याच लेखमालेत घेऊ.

…तर यावेळी ‘पावशा’च्या पावसाला केलेल्या आग्रहाच्या आमंत्रणाविषयी. त्याने पावसाला घातलेली आर्त साद अनेक संस्कृतींनीही टिपली. अनेक भाषांमध्ये पावशाची ‘बोली’ नोंदली गेली. कशी असते त्याची स्वरावली?

आपल्याकडे आपण ज्याला पावशा म्हणतो त्याला पाश्चात्य जग ‘ब्रेनफीवर बर्ड’ म्हणून ओळखतं. वास्तविक तो हिंदुस्थानी उपखंडात वावरणाराच मोठय़ा चिमणीसारखा तपकिरी पांढऱ्या रंगाचा आणि डोळ्यांभोवती पिवळी किनार (आयरिंग) असलेला पक्षी. त्याची शेपूट मात्र बऱ्यापैकी लांब. एकूण आकार साधारण 34 सेंटीमीटरचा. पिसारा असलेला हा पक्षी ‘स्पॅरोहॉक’ किंवा ‘शिक्रा’ पक्ष्यासारखा दिसतो. पावशाचे नर-मादी साधारण सारखेच दिसतात.

पावसाळ्यापूर्वी या पक्ष्यांच्या मीलनाचा मोसम असल्याने त्यातील नर विशिष्ट स्वरात मादीला साद घालतात. हा ‘कॉल’ माणसांच्या कानात गुंजण्याचं आणि लक्षात राहाण्याचं कारण म्हणजे ‘पावशा’सुद्धा कोकिळासारखाच (कोकिळेसारखा नव्हे) पुनः पुन्हा साद घालत राहातो. मात्र त्याची साद वैशिष्टय़पूर्ण असते. कोकीळ ‘कुहूकुहू’ अशी दोन वेळा साद घालत राहातो. तर पावशाचं ‘कुहू’ आधी एकदा मग तीनदा आणि असं पाच आवर्तनात स्वर वाढवत जातं. नेटवर ते ऐकता येईल. आपल्याकडे तो ‘पेरते व्हा’चा संदेश देतो! पावशाचा स्वर तीव्रतेने कानी पडतो, पण दिसत नाही. अनेकदा पावशाच्या नर-माद्यांच्या साद-प्रतिसादाची वेळ रात्रीची किंवा चांदण्या रात्रीची असते. गंमत अशी की, ‘पावशा’चे स्वर विविध देशांतील लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषेनुसार ‘ऐकू’ येतात. पाश्चात्यांना त्याचा उच्चार ‘ब्रेन-फीवर’ असा वाटला! कोणाला तो ‘ओ लोर’ असा भासला. बंगाल्यांना ‘चॉख गेलो’सारखा ऐकू आला. हिंदी भाषिकांना तो फारच रोमॅन्टिक म्हणजे ‘पिया कहन’ असा वाटला. बोडो लोकांना त्याने ‘हाव फिशा हौवा’ (मुला कुठे आहेस?) अशी अनुभूती दिली… तर उन्हाळय़ानंतर पावसाच्या प्रतीक्षेत आतुरलेल्या मराठी मनाला पावशा ‘पाऊस आला’ आणि ‘पेरते व्हा’ असा सांगावा देतोय असं वाटलं.

कॉमन हॉक-ककू किंवा पावशाचं दर्शन पावसाच्या आगमनापूर्वी होत असल्याने शेतीप्रधान महाराष्ट्राला त्याची वारंवार उमटणारी साद ‘पाऊस आला… पाऊस आला’ अशी वाटणं साहजिक आहे. आश्चर्याची गोष्ट किंवा योगयोगाची म्हणा, मुंबईत 9 जूनपर्यंत त्याचं दर्शन क्वचित का होईना झालं. इतरत्रही झालंच असेल. नीरव शांततामय वातावरणात म्हणजे मानवी उपद्रवांचा कल्लोळ नसतो. तिथे पक्ष्यांचं गुंजन स्पष्टपणे ऐकू येतं. मुंबईपासून सत्तर-ऐंशी किलोमीटर अंतरावरच्या उंबरोली येथे मित्राचं फार्महाऊस आणि आठ-दहा एकराचं जंगल आहे. त्यामागे दूर बारवी धरणालगतचा डोंगरही दिसतो. अशां वनश्रीत दडलेले आपल्या पृथ्वीवरचे ‘सहसजीव’ सहज दिसतात. तिथेच कधीतरी मोरही दिसतात आणि मन प्रसन्न करतात.