‘टीईटी’ पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांची कठोर परीक्षा, आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; विरोधक शिक्षणमंत्र्यांना घेरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्यातील ‘टीईटी’ पेपरफुटीचे प्रकरण बाहेर आले आहे. टीईटी पेपरफुटी, शिंदे गटाच्या आमदाराचा 56 टक्के टक्केवारीचा कथित व्हायरल व्हिडीओ अशा मुद्दय़ांवर उद्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला कठोर परीक्षेला सामोरे जावे लागेल.

राज्य सरकारने पेपरफुटीच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली असली तरी विरोधकांकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱया आठवडय़ाला उद्यापासून (सोमवार) सुरुवात होत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकारावरून देशभर गदारोळ उडाला असताना टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर ओढवली आहे. राज्यातील हजारो भावी शिक्षकांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या टीईटीचा पेपर फुटल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. सभागृहात हा प्रस्ताव स्वीकारून त्यावर चर्चा होणार की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षाला शांत करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून राज्य सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले जाण्याची चिन्हे आहेत.

‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर विरोधी पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधी पक्षाकडून ‘नीट’चा न्याय ‘टीईटी’ ला लावून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या मागणीसाठी विरोधी पक्ष सभागृहात तसेच सभागृहाबाहेर आक्रमक राहण्याची चिन्हे आहेत.

‘नीट’च्या अडचणीत टीईटीची भर

नीट पेपरफुटीचे पडसाद अधिवेनाच्या पहिल्या आठवडय़ात उमटले. महाराष्ट्रातून या परीक्षेला सुमारे अडीच लाख विद्यार्थी बसले होते. नीटचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला तरी या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे आणि आता टीईटीचा पेपर भिवंडीत फुटला आहे.नीटच्या विषयावर निवेदन करण्याची मागणी शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे

टक्केवारीवरून आमदार क्षीरसागर अडचणीत

शिंदे गटाचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर आणि कंत्राटदार यांच्यातील टक्केवारीच्या संभाषणाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 40 लाखांच्या टक्केवारीवरून चर्चा होताना दिसत आहे. यामुळे क्षीरसागर अडचणीत आले आहेत काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका बैठकीत कंत्राटदारांनी कंत्राटाच्या रकमेपैकी 56 टक्के रक्कम लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना वाटावी लागते, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून आमदार क्षीरसागर यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या तुंबईवर आज चर्चा

मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आणि नालेसफाईची पोलखोल झाली. महापौर रितू तावडे पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या पुढय़ातच पालिकेचा अधिकारी गटारात पडला. त्यावरून विधान परिषदेत विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱयांना कोंडीत पकडले. मुंबईच्या तुंबईवरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यावर निवेदन करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी केली. त्यामुळे सरकार यावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांकडून जोरदार लावून धरली जाणार आहे. विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधी पक्षनेत्याविना विरोधकांनी सत्ताधाऱयांना विविध मुद्दय़ांवरून कोंडीत पकडल्याचे चित्र आहे