
सततचा पाऊस, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कपडे पूर्णपणे सुकत नाहीत. त्यामुळे त्यांना कुबट वास येतो आणि बुरशी किंवा जिवाणू वाढण्याचा धोका वाढतो. मात्र, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास ही समस्या सहज टाळता येते.
कपड्यांचा कुबट वास दूर करण्यासाठी हे उपाय करा
जास्त डिटर्जंट वापरल्यास त्याचा थर कपड्यांवर राहतो आणि ओलावा अडकून दुर्गंधी निर्माण होऊ शकते. शेवटच्या रिन्समध्ये थोडे पांढरे व्हिनेगर किंवा जंतुनाशक द्रव घातल्यास वास कमी होण्यास मदत होते.
वॉशिंग मशीनमध्ये एक अतिरिक्त स्पिन सायकल चालवल्यास कपड्यांतील जास्तीत जास्त पाणी निघून जाते आणि ते लवकर सुकतात.
खिडकीजवळ, गॅलरीत किंवा पंख्याखाली कपडे वाळवावेत. बाथरूम किंवा दमट जागेत कपडे वाळवणे टाळा.
एसी असल्यास त्याचा वापर करा. ते नसल्यास कपड्यांजवळ खडे मीठ किंवा सिलिका जेलची पॅकेट्स ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो.
कपडे जवळपास सुकले असतील तर इस्त्री केल्याने उरलेला ओलावा निघून जातो आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
या गोष्टीही लक्षात ठेवा
पावसाळ्यात हलके आणि लवकर सुकणारे कपडे वापरा.
कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीन नियमित स्वच्छ करा.
मशीन वापरल्यानंतर त्याचा दरवाजा काही वेळ उघडा ठेवा, जेणेकरून आत ओलावा साचणार नाही.
या साध्या उपायांचा अवलंब केल्यास पावसाळ्यातही तुमचे कपडे अधिक काळ ताजे, स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त राहू शकतात.




























































