
भाड्याच्या पैशांवरून मीरा-भाईंदर महापालिका आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाड्यापोटी भाईंदर पोलिसांकडे पालिकेचे तब्बल ७ कोटी २४ लाख ९४ हजार ७२७ रुपये थकले आहेत. हे पैसे तत्काळ अदा करावेत, अशी मागणी पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र अतिक्रमणविरोधी मोहीम, निवडणुका आणि शहरातील इतर बंदोबस्तापोटी पालिका आम्हाला ५ कोटी २० लाख ६६ हजार ९११ रुपये देणे बाकी असून भाड्याचे पैसे त्यातून कापून घ्या, असे उत्तर देत पोलिसांनी भाड्याचे पैसे देण्यास नकार दिला आहे. या अजब गजब सोल्युशनवर पालिकेने संताप व्यक्त करत कायदा व सुव्यवस्था राखणे आणि पालिकेच्या कारवाईला संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्यच असल्याचे खडेबोल सुनावले आहेत.
मीरा-भाईंदर पोलीस मुख्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, काशिगाव व नयानगर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेसाठी महापालिकेने आपल्या मालकीच्या इमारती आणि जागा भाड्याने दिल्या आहेत. या जागांच्या भाड्यापोटी पोलिसांकडे ७ कोटी २४ लाख ९४ हजार ७२७ रुपये रक्कम थकीत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने अप्पर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पोलिसांकडे थकीत असलेले कोट्यवधी रुपयांचे भाडे तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाची दिली आठवण
पोलिसांच्या अजब गजब उत्तरानंतर पालिकेने त्यांना न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली आहे. कायदा सुव्यवस्था राखणे आणि पालिकेच्या कायदेशीर कामात मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्यच असल्याचे सांगितले आहे. यासाठी प्रशासनाने पालिका अधिनियमच्या कलम ४८३ चा हवाला दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना स्थानिक पोलिसांनी पालिकेला तत्काळ व पुरेसे संरक्षण देणे बंधनकारक असल्याची आठवण करून दिली आहे.






























































