नसरापूर बलात्कार, हत्या प्रकरण – नराधम भीमराव कांबळेला कोर्टाकडून फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नसरापूरमध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी नराधन भीमराव कांबळेला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. चिमुरडीवर अत्याचार करून तिचा ठेचून मारल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता. नसरापूरसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि निदर्शनं झाली होती. तसेच तमान नागरिकांनी आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. कोर्टाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे मान्य करत भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या चिमुरडीवर कांबळे याने अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांत तपास पूर्ण करून 1 हजार 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे 55 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

याप्रकरणी युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ऍड. अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्त्वपूर्ण निकालांचे दाखले दिले. चिमुरडी उन्हाळ्याची सुट्टी आनंदामध्ये घालवण्यासाठी आजीच्या घरी गेली होती. आरोपी गाठीशेव देतोय, गोठ्यातील वासरू दाखवतोय असे सांगत असल्याने चिमुरडीने आजोबा या नात्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत गेली. वासनेपोटी नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. नराधमाचे हे कृत्य घृणास्पद आणि क्रूर आहे. चिमुरडीवर मृत्यूनंतरही अत्याचार करणाऱ्या या नराधमाच्या देहबोलीवरून त्याला पश्चाताप झालेला दिसत नाही. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने त्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी ऍड. मिसर यांनी केली होती. पीडितेच्या कुटुंबीयांतर्फे ऍड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडताना कठोर शिक्षेची मागणी केली होती.