
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना गप्प करण्यासाठी भाजपने खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी दिल्याचा दावा करणाऱ्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तीन सदस्यांच्या या चौकशी समितीची धुरा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही क्लिप बनावट असल्याचे दावे भाजप व शिंदे गटाकडून सुरूच असल्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटील यांनी माझ्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप्स असल्याचे सांगत आज पुन्हा खळबळ उडवून दिली.
मराठा आंदोलनासह राज्यातील विविध आंदोलने व विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात पडद्यामागे आखल्या जाणाऱ्या कथित कारस्थानांची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी समोर आणली होती. भाजपने जरांगे यांना श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून 500 कोटी दिल्याचा दावा एक महिला या ऑडिओत करत आहे. या क्लिपनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. शिंदे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, तर या क्लिपच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करून सूत्रधारांचा चेहरा समोर आणण्याची मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली होती. विरोधकांनीही यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली.
‘क्लिपमध्ये बोलणाऱ्या चार-पाच जणांना वाचवले नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली तरच या कारस्थानामागे फडणवीस आणि शिंदे नव्हते हे सिद्ध होईल. क्लिपमध्ये बोलणारे लोक आता भाजपच आम्हाला संपवतेय असे म्हणत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. हा सगळा विचित्र प्रकार आहे. फडणवीसांनी या लोकांचा शोध घेतला पाहिजे,’ असेही जरांगे म्हणाले.
त्या बाई खोटं कशाला बोलतील?
‘मी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक बाई बोलताना ऐकायला येतात. या बाई भाजपमध्ये कोणत्याही चिल्लर पदावर काम करत नाहीत, त्या अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करतात अशी माहिती आहे. भाजपचे धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो असेही कळले आहे. एवढय़ा जबाबदारीचे काम करणारी बाई खोटं कशाला बोलेल, असा सवाल जरांगे यांनी केला. शिंदेंना 500 कोटी रुपये दिले असतील तर भाजप गप्प बसणार नाही, शिंदे यांनी पैसे घेतले नसतील तर ते भाजपला सोडणार नाहीत. भाजप आणि शिंदे यांच्यात प्रचंड खदखद आहे’, असे जरांगे म्हणाले.
‘एआय’ला एवढे मराठीचे ज्ञान नाही
‘एआय’च्या मदतीने एवढी मोठी ऑडिओ क्लिप बनवता येणे शक्यच नाही. ‘एआय’ला अजून मराठीचे तेवढे ज्ञान नाही. ‘असतील नोटा, सांजच्याला भेटा, भेटवा, नाचवा, मोकळे करा, ही भाषा एआयला येते का?’ असा सवाल जरांगे यांनी केला. ‘मुख्यमंत्र्यांनी हेतू विचारलाय, परंतु फडणवीसांनी आमच्या हेतूंवर शंका घेण्याऐवजी क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांवर शंका घेतली पाहिजे. सत्य कितीही दिवसांनी बाहेर येऊ निघू द्या, पण प्लॅनिंग काय होती, हे शोधलं पाहिजे. आमच्याआधी तुम्ही ही क्लिप बाहेर का काढली नाही?’
ईडी चौकशी करा! संजय राऊत यांचे अमित शहांना पत्र
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. ‘शिंदे गट आणि भाजपमध्ये झालेल्या कथित व्यवहाराची ईडी चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘आजपर्यंत भाजप आमदार, खासदार, राजकीय पक्ष आणि निवडणुकांचे सौदे करत होता, आता आंदोलने खरेदी करायला सुरुवात केली आहे. भाजपने श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना 500 कोटी दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे पुठून आले? ते जरांगे यांना मिळाले का? हा मनी लॉण्डरिंगचा प्रकार असून याचा तपास ईडीकडे सोपवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
शैलेश बलकवडे यांच्याकडे तपासाची धुरा
शैलेश बलकवडे यांच्यासह या एसआयटीमध्ये पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडे यांचा समावेश आहे. क्लिप खरी आहे की बनावट हे सिद्ध करण्यासाठी क्लिपची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार आहे. जरांगे यांनी मात्र एसआयटीच्या स्थापनेनंतर सरकारवर टीका केली आहे. ‘सरकारने एसआयटी स्थापन करून छक्के-पंजे खेळू नये, चौकशीच्या तळाशी जाणे गरजेचे आहे. शैलेश बलकवडे जालन्याचे एसपी होते, ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असले तरी त्यांचे काम निष्पक्षपणे व्हायला हवे.’ असे जरांगे यांनी म्हटले आहे.






























































