नोएडामध्ये पुन्हा एसीचा स्फोट; 22 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-एनसीआरमध्ये आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सोमवारी सकाळी आणखी एका भीषण आगीची घटना घडली. सेक्टर 119 मधील अरण्य सोसायटीच्या 22 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट झाल्याचा संशय असून, त्यानंतर भीषण आग लागली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला टॉवरमधून धूर निघताना दिसला. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि शेजारच्या फ्लॅटलाही आपल्या विळख्यात घेतले. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली आणि प्राथमिक स्तरावर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे वृत्त आज तक ने दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एसीचा स्फोट हे आगीचे संभाव्य कारण मानले जात असून, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. अलीकडील काळात एसी स्फोटामुळे लागणाऱ्या आगींच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी एसीची नियमित देखभाल करणे आणि विद्युत सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.