
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दिल्लीतील इंडिया आघाडीचे आंदोलन यशस्वी झाले आहे. 1974 नंतरची 1 नोव्हेंबर 2026 ची रॅली ऐतिहासिक ठरली आहे. रामलीला मैदानावरून संदेश देण्यात आला आहे की, ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि शहांना जावं लागेल. हा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात आल्याने ही रॅली यशस्वी झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
1974 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानातून लोकशाही रक्षणासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. काही तज्ज्ञांच्या मते त्या रॅलीपेक्षा ही रॅली मोठी होती. 1974 नंतरची 1 नोव्हेंबर 2026 ची रॅली ऐतिहासिक ठरली आहे.
ही रॅलीदेखील लोकशाही रक्षण, संविधान वाचवणे आणि संवैधानिक संस्था वाचवण्यासाठी काढण्यात आली होती. जे आवाहन जे.पी. नारायण यांनी केले होते, तेच राहुल गांधी आणि आम्ही जनतेला केले आहे. भाजपची नजर कमजोर झाली आहे, त्यांना जवळचे आणि लांबचेही दिसत नाही. त्यामुळे त्यांचे नेत्र आता पैलतीरी लागले आहेत. कोणीतरी त्यांना नेत्रदान करावे लागेल. भाजपला कोणीतरी नेत्रदान करावे, यासाठी आम्ही मोहीम सुरू करणार आहोत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही डोळ्याने बघत होतो तेथे काय परिस्थिती होती. मैदान गर्दीने ओसांडून वाहत होतं. रामलीला मैदानावर जेवढी गर्दी होती, तितकीच गर्दी अमित शहांकडूनअनेक ठिकाणी अडवून ठेवण्यात आली होती. कालची जी रॅली होती चलो दिल्ली ती यशस्वी झाली आहे. जो संदेश रामलीला मैदानावरून द्यायचा होता तो काल देण्यात आलेला आहे. संदेश इतकाच आहे की ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि शहांना जावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला बोलायला देण्यात आले नाही, अशी टीका भाजप करत आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, असं काही नाही. लोकं सकाळी आठ वाजल्यापासून बसलेले होते. भाषणं लांबत गेली आणि गर्दीचा रेटा वाढत गेला तो अगदी स्टेज पर्यंत सरकायला लागला. तेव्हा आम्ही वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी यांना सांगितले की, आता राहुल गांधी यांनी बोलून सभा संपवावी. वाढती गर्दी आणि माइक बंद पडणे, वीज कनेक्शन सुरू राहावे, यासाठी हाच एक पर्याय होता. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची चिंता करू नये, त्यांनी महाराष्ट्राची चिंता केली असती तर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली नसती, असा घणाघातही त्यांनी केला.

























































