
अरुणाचल प्रदेशातील ‘नाह’ (Nah) आदिवासी समुदायाने अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या कथित चिनी घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली असून, गेल्या सहा वर्षांत चिनी लष्कराने (PLA) त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या चरणाची (कुरणाची), शिकारीची आणि शेतीची एक मोठी जमीन बळकावल्याचा दावा केला आहे.
अप्पर सुबानसिरीच्या येथील आदिवासी समूदायाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या सादर केलेल्या एका निवेदनात, ‘नाह वेल्फेअर सोसायटी’चे (NWS) अध्यक्ष केरू चादर यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या पूर्वजांची जमीन जिथे आमचे शिकारीचे क्षेत्र होते, जिथे आम्ही काही वर्षांपूर्वीपर्यंत मुक्तपणे फिरत होतो आणि जंगलातील उत्पादने गोळा करत होतो, तसेच आमच्या जनावरांच्या चरण्याची जी क्षेत्रे होती, ती आता चिनी लष्कराच्या (PLA) ताब्यात आहे’.
अप्पर सुबानसिरीमधील ताक्सिंग महसूल मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ठिकाणी चिनी हालचाली होत असल्याचा आरोप करत ‘एनडब्ल्यूएस’ने म्हटले आहे की, चिनी सरकारने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवून आंतरराष्ट्रीय सीमेवरील क्षेत्रांवर आपले नियंत्रण वेगाने वाढवण्यास सुरुवात केली आहे.
नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नलो यांनी सांगितले की, हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने याची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. ‘प्रशासनाकडून या आरोपांना अधिकृतपणे दुजोरा मिळणे गरजेचे आहे’, असे नलो म्हणाले; आणि पुढे म्हणाले की, ‘हा एक राष्ट्रीय मुद्दा असल्यामुळे चिंता वाटणे साहजिक आहे’.
या घुसखोरीचे सविस्तर वर्णन करताना ‘एनडब्ल्यूएस’ने आरोप केला आहे की, चिनी सैन्याने ‘जास्तीत जास्त जमीन बळकावण्याच्या हेतूने’ गेल्या काही वर्षांत ताक्सिंग सीमाभागात आपल्या हालचाली लक्षणीयरीत्या वाढवल्या आहेत.
या आदिवासी संघटनेच्या मते, २०२० पर्यंत त्यांच्या पारंपारिक नियंत्रणाखाली असलेली अनेक ठिकाणे कथितपणे चिनी सैन्याने बळकावली आहेत.
संघटनेने सांगितले की, असाफिला भागातील ओयिंग, पनिअर (चुजार्ता भाग), मारपान (मारनाफे), पोत्रांग (तलाव) आणि तिनडिंगटांग (टीजी) सारखी ठिकाणे हळूहळू चिनी घुसखोरीच्या विळख्यात आली आहेत; आणि असाही आरोप केला की ही ठिकाणे ताक्सिंग मुख्यालयाच्या अगदी जवळ आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणे ही स्थानिक आदिवासी समूहांची पवित्र तीर्थक्षेत्र मानले जातात.
‘चिनी लष्कराने हिंदुस्थानच्या हद्दीत रस्ते आणि कॅम्प्स बांधले आहेत’
या निवेदनात चिनी सैन्याने हिंदुस्थानच्या भूभागावर लष्करी कॅम्प्स आणि रस्ते बांधल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘आम्ही आमच्या लष्करावर शंका घेत नाही आणि आमचा त्यांच्यावर नेहमीच पूर्ण विश्वास आहे. ते अनेक वर्षांपासून आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत. ताक्सिंग भागात चिनी लष्कराच्या सध्याच्या हालचालींचा हेतू आणि वेग अतिशय भयानक असून ही आमच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. आम्ही आपली जमीन दिवसेंदिवस इंच-इंच त्यांच्याकडे गमावत चाललो आहोत’, असे चादर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, यावर जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. जिल्हाधिकारी गंबो तासो यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ अधिकारीही यावर कोणतीही टिप्पणी करण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.


























































