शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन; टीईटी पेपरफुटीचा जोरदार निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
youth-congress-protest-outside-education-minister-dada-bhuse-bungalow-over-tet-paper-leak

टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने मंत्रालयासमोरील शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बॅनर झळकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानंतरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह गनिमी काव्याने भुसे यांच्या बंगल्यासमोर पोहोचून शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर “दादा भुसे राजीनामा द्या’’ असे पोस्टर फडकावले. यावेळी “पेपरचोर गद्दीछोड’’, “दादा भुसे राजीनामा द्या’’, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा’’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी बंगल्यासमोरील परिसरातही “पेपरचोर गद्दी छोड’’ अशा घोषणा लिहून संताप व्यक्त केला.

शिक्षणमंत्री भुसे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शबरीन यांनी केली. पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत युवक काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.