
कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात रविवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. दुपारपासून कुडाळ शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाने वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांसह नागरिकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 18.25 मि.मी.एवढी पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात भात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी भात लावणीलाही सुरूवात झाली आहे.
यंदा विलंबाने दाखल झालेला पावसाने गेल्या चार दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र रविवार पासून कुडाळसह सर्वत्र पावसाने पुन्हा जोर धरला. सकाळच्या सत्रात अधूनमधून पावसाची संततधार सुरू होती. मात्र दुपारनंतर कुडाळ शहरासह तालुक्यात पावसाने अधिक जोर धरला. शहरातील पोस्ट ऑफिस चौक परिसरात मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले.
आंबा, काजू कलमांच्या लागवडीचीही कामे जोरात सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 18.25 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. देवगड तालुक्यात 05 मि.मी., मालवण 43 मि.मी., सावंतवाडी 02 मि.मी., वेंगुर्ला 23 मि.मी., कणकवली 05 मि.मी., कुडाळ 14 मि.मी., वैभववाडी 34 मि.मी., व दोडामार्ग 20 मि.मी. असा पाऊस पडला.


























































