
‘नीट’ पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’मधील गोंधळाप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले. याच ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) गेल्या 9 दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीने २० जूनपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू केली होती. प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार, असे ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या निदर्शनांमध्ये अनेक शेतकरी नेत्यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला होता. आजपासून त्याच व्यासपीठावर सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले. वांगचुक यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाच्या निर्णयाबाबत वांगचुक यांनी सांगितले की, मी शिक्षण आणि लडाख या दोन्ही मुद्द्यांसाठी उपोषण करत आहे. शैक्षणिक यंत्रणेसंदर्भात देशाचे तरुण आवाज उठवत असतील, तर मी गप्प कसा राहू शकतो? त्यांना पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य आहे.
शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले. त्यांच्यापैकी अनेकांनी संपूर्ण दिवसभर उपोषण करत वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला. सर्व खाप पंचायतींचे प्रतिनिधीदेखील आज उपोषणात सहभागी झाले होते. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी येण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप पंचायतीचे समन्वयक ओमप्रकाश धनकड यांनी केला.


























































