
महिला अत्याचाराचा तपास अनुभवी महिला पोलीस अधिकारीच करेल, असे स्पष्ट आदेश देत उच्च न्यायालयाने एका पीडितेला दिलासा दिला.
मी अंधेरी पोलिसांत तक्रार केली आहे. याचा तपास एक पुरुष पोलीस अधिकारी करत आहे. तपास अधिकारी पुरुष असल्याने मला घटनेतील सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगता येत नाहीत. एफआयआरमध्ये सर्व तपशील नाही. तेव्हा हा तपास एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी या पीडितेने केली.
न्या. सारंग कोतवाल व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पीडितेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्यानेच करायला हवा. तेव्हा अंधेरी पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने हा तपास अनुभवी महिला पोलीस अधिकऱ्याकडे सोपवावा, असे आदेश देऊन खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
पीडितेची काळजी घ्या
हा तपास करताना पीडितेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी. आधी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गुह्याचा संपूर्ण तपशील नाही, असे पीडितेचे म्हणणे आहे. तेव्हा पीडितेचा पुरवणी जबाबदेखील पोलिसांनी नोंदवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


























































