
जुलै तोंडावर आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे राज्यातील पाणी संकट गंभीर होत चालले आहे. जलस्रोतही कोरडेठाक पडू लागले आहेत. तीव्र पाणीटंचाईमुळे राज्याच्या विविध जिह्यांमध्ये 1200 पेक्षा जास्त टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. ती संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून विस्कळीत झाला आहे. हवामानातही बदल झाला असून दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी वादळी वारे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम पावसाच्या ढगांच्या हालचालींवर होत आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाऊस होतो, तर काही ठिकाणी होत नाही.
उन्हाच्या झळा तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून माणसांप्रमाणे जनावरांनाही टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. सरकारने यावर उपाय म्हणून धरणांतील पाणी शेतीसाठी बंद करून ऑगस्टपर्यंत फक्त पिण्यासाठी वापरण्याचे बंधन घातले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्स
| छत्रपती संभाजीनगर | 415 |
| पुणे | 292 |
| नाशिक | 185 |
| कोकण | 177 |
| अमरावती | 95 |


























































