
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासात प्रत्येक घराला पार्किंग मिळणे व खेळाचे मैदान नवीन टॉवरच्या मध्यभागी घेणे शक्य असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी स्वतः वास्तुविशारद नेमून त्याच्याकडून याबाबतचा अहवाल घेतला आहे. यानुसार म्हाडाने कार्यवाही केल्यास आमची मागणी मान्य होऊ शकते, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
रहिवाशांनी वास्तुविशारद प्रवीण गजरालवर यांची नियुक्ती करून सर्वेक्षण केले. पुनर्विकासात प्रत्येक घराला पार्किंग मिळू शकते. नवीन टॉवरच्या मध्यभागी खेळाचे मैदान घेणे शक्य आहे, असा अहवाल गजरालवर यांनी दिला आहे. रहिवाशांनी या अहवालाचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व म्हाडा प्रशासनाला निवेदन दिले आहे. म्हाडाच्या आराखड्यानुसार सध्या खेळाचे मैदान नवीन टॉवरच्या एका बाजूला आहे. हे मैदान नवीन सर्व टॉवरच्या मध्यभागी घ्यावे, असे बीडीडी चाळीतील सर्व रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशी संघाचे संदीप चव्हाण, ऍड. मनोज टपाल, अनंत धनावडे व अन्य रहिवाशांमार्फत हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. आमच्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून रहिवाशांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे साकडे या निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला मैदान असल्याने धोका
मुलांच्या हितासाठी खेळाचे मैदान नवीन टॉवरच्या मध्यभागी असणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला एका बाजूला मैदान असल्यास मुलांसाठी धोकादायक होऊ शकते. कारण या रस्त्याला वाहनांची सतत रहदारी असते. तेव्हा म्हाडा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
भाडेवाढ करा
म्हाडाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात भाडेवाढ करावी, अशी विनंती रहिवाश्यांनी केली आहे. सध्या म्हाडाकडून 25 हजार रुपये प्रति महिना ट्रांझिट भाडे दिले जात आहे. या रकमेत नायगावमध्ये भाडयाने घर मिळणे शक्य नाही, याकडेही रहिवाश्यांनी लक्ष वेधले आहे.


























































