
अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच भेदून मातीमाफियांनी पुन्हा ऐतिहासिक द्रोणागिरी पोखरायला सुरुवात केली आहे. रात्री आणि विशेष करून सुट्टीच्या दिवशी चोरट्या पद्धतीने बेकायदा उत्खनन केले जात असल्याने उरणवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान बेकायदेशीर उत्खननाला तत्काळ आळा घालून महसूल विभागाने पुन्हा कारवाईला सुरुवात करावी, अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने तहसीलदारांकडे केली आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी उद्या सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
द्रोणागिरी पर्वताला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. या डोंगरावर द्रोणागिरी मातेचे पुरातन मंदिर आहे. उरणवासीयांच्या धार्मिक भावना या पर्वताशी जोडल्या आहेत. याच पर्वताच्या नावावरून द्रोणागिरी नोड विकसित केला आहे. मात्र या द्रोणगिरी पर्वताच्या पायथ्याशी बिल्डर्स लॉबीकडून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे. उरण सामाजिक संस्थेने द्रोणागिरी पर्वत बचावमोहीम हाती घेतल्यानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत द्रोणागिरी पर्वताच्या रक्षणासाठी जागता पहारा ठेवण्याचे आदेश दिले होते. महसूल विभागातील अधिकारी काही महिने २४ तास येथे पहारा देत होते. परंतु आता पुन्हा मातीमाफियांकडून द्रोणागिरी पर्वताला लक्ष केले जात असून उत्खननाला सुरुवात केली आहे.
२४ तास गस्त तैनात करा
द्रोणागिरी डोंगर वाचवण्यासाठी उरण सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे लढा देत आहे. मात्र प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कानाडोळा करत असल्याने मातीमाफिया रात्री अपरात्री डोंगर पोखरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा २४ तास खडा पहारा द्यावा, अशी मागणी या संस्थेने तहसीलदारांकडे केली आहे.
अन्यथा न्यायालयात जाऊ
गेल्या १८ वर्षांत संस्थेने केलेल्या पत्रव्यवहार व आंदोलनांमुळेच द्रोणागिरी वाचला आहे. आता पुन्हा उत्खनन सुरू झाले असून प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस अॅड. राजेंद्र मढवी, सल्लागार संतोष पवार यांनी दिला आहे.





























































