
मुसळधार पावसामुळे वाढलेले भूस्खलन, अचानक पूर आणि अस्थिर हिमनद्यांमुळे मार्ग धोकादायक बनल्याने हिमाचल प्रदेश प्रशासनाने श्रीखंड महादेव यात्रा आणि किन्नौर कैलास यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुल्लू आणि किन्नौर जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञांच्या पाहणी अहवालानंतर हा निर्णय घेतला. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स तसेच महसूल आणि वन विभागाच्या पथकांनी श्रीखंड महादेव यात्रेचे पारंपरिक आणि पर्यायी दोन्ही मार्ग असुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. असे वृत्त पीटीआय ने दिले आहे.
सुमारे 16 हजार 900 फूट उंचीवरील श्रीखंड महादेव यात्रेचा 35 किलोमीटरचा एकमार्गी प्रवास उंच पर्वतीय भागातून जातो. तपासणी अहवालानुसार भीमद्वारी–पार्वती बाग परिसरातील मार्ग तीव्र चढ-उतार, निसरड्या वाटा, पर्वतीय ओढ्यांमुळे अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे भूस्खलन, दरडी कोसळणे आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढला असून, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणेही कठीण ठरू शकते.
दरम्यान, सुमारे 19 हजार 850 फूट उंचीवरील किन्नौर कैलास यात्राही स्थगित करण्यात आली आहे. पाहणी पथकाच्या अहवालानुसार मिलिंग खाटा ते शिवलिंग या मार्गावर मोठ्या हिमनद्या, गुफा आणि सोरंगदरम्यान अस्थिर खडक तसेच नव्याने झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रवास धोकादायक झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमान वाढल्याने बर्फ वेगाने वितळत असून त्यामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका आणखी वाढला आहे. प्रशासनाने बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.


























































