
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित चोरीच्या प्रकरणावरून काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी याप्रकरणी सरकारवर गंभीर आरोप करत थेट कारवाईच्या अभावावर बोट ठेवले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देणगीच्या पैशांमध्ये चोरी झाल्याचा संशय व्यक्त करूनही याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल खेडा यांनी उपस्थित केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पवन खेडा म्हणाले की, राम मंदिरासाठी जगभरातून आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांच्या व्यवस्थापनात मोठी अनियमितता आणि गैरव्यवहार झाला आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, एसबीआयने स्वतः या व्यवहारांमधील तफावतीची नोंद घेत चोरी झाल्याचा संशय व्यक्त करणारा रेड फ्लॅग दिला होता. बँकेसारख्या जबाबदार आणि देशातील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थेने अधिकृतपणे इशारा देऊनही सरकारने आणि संबंधित तपास यंत्रणांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याऐवजी यामागील मुख्य सूत्रधारांना आणि मोठ्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.
प्रभू श्रीरामाच्या नावाने गोळा केलेल्या भाविकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या चोरांना सरकार पाठीशी घालत आहे, अशी टीका खेडा यांनी केली. या महाघोटाळ्यात केवळ कनिष्ठ स्तरावरील काही कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दिखावा केला जात आहे. मात्र एसबीआयने दिलेला अहवाल आणि बँकेचे धोक्याचे इशारे डावलून ज्यांनी हा कोट्यवधींचा गैरव्यवहार केला, ते खरे गुन्हेगार अद्याप मोकाट कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


























































