
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी लवकुश मिश्रा याने राम मंदिर ट्रस्टमध्ये नोकरीला लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच लाखो रुपयांचा भूखंड खरेदी करून त्यावर आलिशान घराचे बांधकाम सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लवकुशचा अधिकृत पगार आणि त्याची संपत्ती यात मोठी तफावत आढळल्याचे पोलीस तपासात त्याचे धागेदोरे उघड झाले आहेत.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, लवकुश मिश्रा हा राम मंदिर ट्रस्टमध्ये कॅश मोजणी (कॅश-काउंटिंग) पथकाचा सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याला दरमहा अवघा १२,००० रुपये पगार होता. मात्र, वर्षभरापूर्वी या नोकरीत रुजू झाल्यानंतर त्याने लगेचच मोठी मालमत्ता खरेदी केली. अयोध्या-लखनऊ महामार्गाजवळ असलेल्या शहादतगंज-बनबीरपूर भागात त्याने आपली पत्नी सुप्रिया मिश्रा हिच्या नावावर एक भूखंड खरेदी केला. या जागेची सरकारी किंमत कागदोपत्री 8 लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची आणि त्यावर बांधल्या जाणाऱ्या घराची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे.
सुमारे १,००० स्क्वेअर फूट जागेवर लवकुश दोन मजली आलिशान घर बांधत आहे. या घराचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून सध्या वीज जोडणी आणि अंतर्गत कामे सुरू आहेत. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या घराचे बांधकाम सुरू झाले होते. बांधकाम सुरू होण्यापूर्वी लवकुशने तिथे सहकुटुंब येऊन धुमधडाक्यात ‘भूमीपूजन’ही केले होते.


























































