नवरदेव टकला असल्याचे समजताच नवरीचा लग्नास नकार; उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील वरात वधूविनाच परतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाची वरात दारात आली होती, सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. पाहुणेमंडळी लग्नाच्या गडबडीत व्यस्त होती आणि द्वारपालकांचा विधीही उत्साहात पार पडला होता. आता प्रतीक्षा होती ती फक्त जयमाला विधीची. पण याच वेळी काहीतरी असे घडले की, ज्यामुळे लग्नातील आनंदाचे रूपांतर अचानक मोठ्या वादात झाले. हा वाद जेवणावरून किंवा हुंड्यावरून झाला नव्हता, तर नवरदेवाच्या टक्कलपणावरून निर्माण झाला होता. जयमाला विधीच्या काही वेळ आधी नवरीच्या लक्षात आले की तिचा होणारा नवरा टकला आहे. हे समजताच तिने तात्काळ लग्नास स्पष्ट नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूरमधील एका गावातील तरुणाची वरात शनिवारी रात्री हंडिया शहरात आली होती. वधू पक्षाकडून वऱ्हाडी मंडळींचे स्वागत संगीत आणि सनईच्या गजरात अतिशय उत्साहात करण्यात आले होते. मात्र, जयमाला सोहळा सुरू होण्यापूर्वीच नवरीला नवरदेवाच्या टक्कलपणाबद्दल समजले. यामुळे संतप्त झालेल्या नवरीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या या निर्णयामुळे वर आणि वधू दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. घरातील आणि नातेवाईकांमधील वडीलधाऱ्या मंडळींनी मुलीला समजावण्याचा आणि तिचे मन वळवण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. वाद जास्तच वाढल्यामुळे अखेर वधू पक्षाकडून पोलिसांना बोलावण्यात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. हंडिया पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये अनेक तास पंचायत चालली. मात्र, या पंचायतीतून कोणताही सकारात्मक मार्ग निघू शकला नाही आणि वधूने सासरच्या घरी जाण्यास ठाम नकार दिला. अखेर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने हा विवाहसंबंध मोडण्याचा निर्णय घेतला. नवरदेवाला वधूशिवायच आपल्या वऱ्हाडी मंडळींसोबत माघारी परतावे लागले.

हंडिया पोलीस स्टेशनचे प्रभारी अनूप सरोज यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, नवरदेव टकला असल्या कारणाने वधूने लग्नास नकार दिल्यााचे सांगितले. दोन्ही पक्षांनी सामोपचाराने आणि परस्पर संमतीने संबंध संपवले आहेत.