
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित चोरीप्रकरणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिरातील सुमारे २०० कोटी रुपयांची रोकड, २०० किलो चांदी तसेच देवाला अर्पण केलेले हिरे चोरीला गेल्याचा खळबळजनक दावा केजरीवाल यांनी केला आहे. या महाघोटाळ्यात सरकार मोठ्या चोरांना आणि प्रभावशाली व्यक्तींना पाठीशी घालत असून, केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दिखावा केला जात असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदभात वृत्त दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (SIT) कारवाई आणि दाखल झालेला एफआयआर ही केवळ एक धुळफेक आणि फसवणूक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एवढा मोठा घोटाळा उच्चपदस्थ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या सहभागाशिवाय इतका काळ चालूच शकत नाही. पोलिसांनी या प्रकरणात केवळ रोख रक्कम मोजणाऱ्या किंवा सुरक्षारक्षकांसारख्या आठ कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. २०० कोटी रुपयांच्या कथित चोरीपैकी आतापर्यंत केवळ ८० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, मग उर्वरित पैसा कुठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली नाही किंवा त्यांची पोलीस कोठडीही मागितली नाही, यावरून हे प्रकरण दाबण्याचा आणि मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.
या घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधारांवर आणि बड्या नावांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, केवळ छोट्या कर्मचाऱ्यांना अटक करून लोकांचे समाधान होणार नाही, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भातही मोठे विधान केले. हे चंदा चोर स्वतः योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कट रचत असून, त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची तयारी करत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. त्यामुळे योगींनी या महापापाचा भाग होऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.


























































