
FIFA World Cup 2026 चे वारे सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात वाहताना दिसत आहेत. मेस्सी, रोनाल्डो यांच्यासह अनेक देशांच्या मातब्बर खेळाडूंच्या नावाचा जयघोष केला जात आहे. फुटबॉल जगतात ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, जर्मनी, इटली या संघांचा दबदबा आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या केप व्हर्डे या संघाने स्पेन आणि उरुग्वे सारख्या बाप संघांना घाम फोडला आहे. साखळी फेरीत एकही सामना न गमावता या संघाने बाद फेरीत धडक मारली असून त्यांचा पुढील सामना 4 जुलै रोजी गतिविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. मात्र, या सामान्यापूर्वी संघाला जबर धक्का बसला असून संघाच्या कर्णधारावर बलात्कारासारखा अत्यंत गंभीर आरोप झाल्यामुळे फुटबॉल जगतात खळबळ उडाली आहे.
ब्राझीलच्या ‘ग्लोबो’ या प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण मार्च 2026 मधील आहे, जेव्हा केप व्हर्डेचा संघ फिफा मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यादरम्यान संघासोबत काम करणाऱ्या एका ब्राझीलच्या महिला ट्रान्सलेटरने केप व्हर्डेचा कर्णधार रयान मेंडेस याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑकलंडमधील एका हॉटेलमध्ये मेंडेसने जबरदस्तीने तिच्या खोलीत घुसून तिचे शारीरिक व लैंगिक शोषण केल्याचे पीडितेने म्हटले आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत महिलेच्या शरीरावर, ओठांवर आणि स्तनांवर जखमांच्या खुणा आढळल्याचे अहवालात समोर आले आहे.
या धक्कादायक घटनेवर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘युएसए टुडे’नुसार, फिफा कोणत्याही गैरवर्तनाची गंभीर दखल घेते आणि या प्रकरणी ते न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सध्या तपास सुरू आहे. पीडित महिलेने यापूर्वी केप व्हर्डेच्या फुटबॉल अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती, परंतु तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. विशेष म्हणजे, अद्याप हे आरोप अधिकृतपणे सिद्ध झालेले नसून, या संपूर्ण प्रकरणावर केप व्हर्डे फुटबॉल असोसिएशनने कोणतीही अधिकृत भूमिका किंवा वक्तव्य जाहीर केलेले नाही.




























































