
चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्गम जिवती तालुक्यातील लचमागुडा गावात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्यामुळे अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. समीर मारोती आत्राम असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे पुन्हा एकदा वेशीवर टांगले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील लचमागुडा येथे समीर आत्राम हा चिमुकला रात्री आपल्या घरात झोपला असताना त्याला विषारी सापाने दंश केला. मुलाची तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी पाठवताना शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक होते. मात्र, ऐनवेळी पाटण आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी धावाधाव केली, पण यंत्रणेकडून वेळेत मदत मिळू शकली नाही. अखेर हताश झालेल्या कुटुंबीयांनी खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि मुलाला गडचांदूर येथील रुग्णालयाकडे नेले.
खाजगी वाहन मिळेपर्यंत आणि गडचांदूर गाठेपर्यंत खूप मोठा विलंब झाला होता. विष शरीरात वेगाने पसरल्याने आणि वेळेत पुढील उपचार न मिळाल्याने अखेर या चिमुकल्याची प्राणज्योत विझली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिवती तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जर वेळेवर सरकारी रुग्णवाहिका मिळाली असती, तर समीरचे प्राण वाचले असते,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा केवळ कागदावरच सुसज्ज आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात असून, दोषींवर कारवाई करण्याची आणि तालुक्यातील आरोग्य सेवा तातडीने सुधारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





























































