
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता बाप्पाची कृपा राहणार आहे. पालिकेच्या पुढाकारातून रोटरी क्लबने विसर्जित केलेल्या गणरायाच्या मूर्तीपासून सुमारे ७६० स्टडी टेबल तयार केले आहेत. या टेबलचे वितरण पालिकेच्या रबाळे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे.
- विसर्जित गणेश मूर्तीपासून स्टडी टेबल तयार करण्याचा उपक्रम हेन्केन इंडिया प्रायवेट लिमिटेड व बिच प्लिझ इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर निधीमधून राबवण्यात आला आहे. हे स्टडी टेबल तयार करण्यासाठी रोटरी क्लब नवी मुंबई यांनी विशेष सहकार्य केले आहे.
- पीओपीवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याच्या पुढील टप्प्यात मूर्तीच्या पीओपीवर प्रक्रिया करून त्यापासून पुनर्वापर करण्यायोग्य पीओपी तयार करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्निकल मुंबई या संस्थेशी विचारविनिमय सुरू आहे, असे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.



























































